नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘जेईई-मेन्स’चा दुसरा टप्पा गुरुवारी सुरळीतपणे पार पडला. ‘कोरोना’चा प्रकोप अद्यापही कायम असल्याने ‘ऑनलाइन’ माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहे. मागील आठवड्यातच पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर झाला.
एनटीएच्या वतीने शहरात १६ ते १८ मार्चदरम्यान विविध बॅचेसमध्ये ‘ऑनलाइन’ परीक्षा घेण्यात आली. ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने केंद्रांवरील गर्दी टाळणे महत्त्वाचे आव्हान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोहोचण्याच्या वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या. सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या कालावधीत ‘बीआर्क’ व ‘बी प्लॅनिंग’साठी परीक्षा झाली. यंदा विद्यार्थ्यांना ‘सॅनिटायझर’ नेण्याचीदेखील परवानगी देण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार प्रयत्नांपैकी ही दुसरी परीक्षा आहे. आता विद्यार्थ्यांना २७ ते ३० एप्रिल आणि २४ ते २८ मे या काळात परीक्षा देण्याच्या आणखी दोन संधी मिळणार आहेत.