नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत नसली तरी तिसऱ्यांदा दैनंदिन रुग्णांची संख्या ५०० वर गेल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे. शनिवारी ५२७ नव्या रुग्णांची भर पडली. चाचण्यांच्या तुलनेत १०.१२ टक्के रुग्ण वाढले. रुग्णांची एकूण संख्या ११४२१८ झाली. आज १० रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३७२४ वर पोहचली.
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात ४० टक्क्याने रुग्णांची घट झाली. परंतु डिसेंबर महिन्याच्या १ तारखेला ५१५, ३ तारखेला सर्वाधिक ५३६ तर आज ५२७ रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. तज्ज्ञांच्या मते, तापमानातील घट व प्रदूषणात वाढ झाल्यास या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोना नियमाचे आणखी कठोरतेने पालन करण्याचे आवाहन केले आहे. आज ५७५६ चाचण्यांमधून ४०६६ आरटीपीसीआर तर ११४१ रॅपिड अँटिजेन चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीत ३२ तर आरटीपीसीआर चाचणीत ४९५ रुग्ण बाधित आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४४०, ग्रामीणमधील ८४ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीणमधील २ तर जिल्हाबाहेरील ३ आहेत.
-शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा वाढले रुग्ण
मेयो, मेडिकलसह एम्समध्ये कमी झालेली कोरोनाबाधितांची संख्या शनिवारी पुन्हा एकदा वाढली. मेडिकलमधील रुग्णांची संख्या २०६, मेयोमध्ये ६८ तर एम्समध्ये ४३ वर पोहचली. विविध खासगी हॉस्पिटलमध्ये १३१६ रुग्ण उपचार घेत आहेत. ४१२४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. आज ३३९ रुग्ण बरे झाले.
::कोरोनाची आजची स्थिती
-दैनिक संशयित : ५७५६
-बाधित रुग्ण : ११४२१८
_-बरे झालेले : १०४७३८
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५७५६
- मृत्यू : ३७२४