लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी आणि हिंगण्यात घडलेल्या हत्येच्या चर्चेला पूर्णविराम बसायचा असतानाच सोमवारी रात्री प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हत्येची तिसरी घटना घडली. अनिल पालकर असे मृताचे नाव आहे. विविध भागात ४८ तासात तीन हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
४८ वर्षीय अनिल पालकर हिंगण्यातील रहिवासी असून ते एका मंगल कार्यालयाचे संचालक होते. गोपालनगरात तिसऱ्या बसथांब्याजवळ पालकरचे मंगल कार्यालय आहे. पालकरच्या इमारतीत कर्नाटकमधील एक बेकरी चालक तसेच शाहू नामक किराणा दुकान भाडेकरू आहेत. किराया वाढवण्याच्या वादातून पालकर दारूच्या नशेत त्यांना रोज शिवीगाळ करायचे. त्यामुळे या दोन भाडेकरूंसोबत त्यांचा नेहमी वाद व्हायचा. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास पालकर या दुकानापुढे जाऊन बरळू लागले. त्यामुळे दोन्ही दुकानातील नोकर समोर आले. तेथे त्यांचा एका महिलेशी वाद झाल्यानंतर दोन आरोपी पालकर यांच्यावर धावून आले. त्यांनी चाकूचे घाव घालून त्यांची हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार भीमराव खंदाळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. पोलीस उपायुक्त हसन नुरूलही घटनास्थळी पोहचले. आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली. काही वेळेतच एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. वृत्त लिहिस्तोवर पोलीस त्याची चौकशी करीत होते.
आरोपी किती?
या प्रकरणात दोनच आरोपी आहेत की आणखी त्यांना चिथावणी देणारे कुणी आहेत, त्याचा तपास केला जात आहे. त्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.