नागपूर : ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट आल्यास याचा सर्वाधिक धोका लसीकरण न झालेल्यांना व ‘कोमॉर्बिडिटी’ असलेल्यांना होऊ शकतो. गंभीर आजार असलेल्या रुग्णांची संख्या ४९.६ टक्के असल्याचे दिसून आले, अशी माहिती प्रसिद्ध श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत क्रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलेल्या एकूण १,७६३ रुग्णांचा केलेल्या अभ्यासाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. डॉ. अरबट म्हणाले, मधुमेह व उच्चरक्तदाब असलेल्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे अभ्यासातून पुढे आले. त्यांना मृत्यूचा धोका हा सामान्य रुग्णांपेक्षा ४.३३ टक्क्याने अधिक होता. हा अभ्यास ‘मेडिकल जनरल’मध्ये प्रकाशितही झाला आहे.
पहिली लाट ७ महिन्यांची तर दुसरी लाट ४ महिन्यांची
कोरोनाची पहिली लाट ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२१ असे एकूण ७ महिन्यांची होती, तर दुसरी लाट ही मार्च २०२१ ते जून २०२१ असे एकूण ४ महिन्यांची होती. यावरून संभाव्य तिसरी लाट यापेक्षा कमी महिन्यांची असण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या लाटेत गंभीर आजार नसलेल्यांची संख्या अधिक
कोरोनाचा पहिल्या लाटेत उच्चरक्तदाबाच्या रुग्णांची संख्या ४२ टक्के तर दुसऱ्या लाटेत ३३ टक्के होती. मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या पहिल्या लाटेत २९ टक्के तर दुसऱ्या लाटेत २४ टक्के होती. हृदयविकार असलेल्या रुग्णांची संख्या पहिल्या लाटेत ७.२३ टक्के तर दुसऱ्या लाटेत २.५ टक्के होती. हायपोथायरॉईड रुग्णांची संख्या पहिल्या लाटेत ६.३२ टक्के, तर दुसऱ्या लाटेत ५.३ टक्के होती. यावरून दुसऱ्या लाटेत गंभीर आजार नसलेल्यांची संख्या अधिक होती.
दुसऱ्या लाटेत मृत्यूचा दर ६.८ टक्के
कोरोनाचा पहिल्या लाटेत ७५.२ टक्के रुग्णांना तर दुसऱ्या लाटेत ८८.५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली. विशेष म्हणजे, पहिल्या लाटेत ८.२ टक्के तर दुसऱ्या लाटेत ६.८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला.
१३७ रुग्णांना लंग फायब्रोसिस
हॉस्पिटलमधील पोस्ट कोविडच्या उपचारासाठी आलेल्या ४५१ रुग्णांमधील १३७ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’ असल्याचे निदान झाले. तर ३१४ रुग्णांना छातीत दुखणे, भूक न लागणे, थकवा येणे, सांधे दुखणे व काही मानसिक आजार दिसून आल्याचेही डॉ. अरबट म्हणाले.