नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेनंतर आणि दुसऱ्या लाटेच्या संकेताच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नववर्ष स्वागतोत्सवाचा जल्लोष करता आला नव्हता. यंदाही स्थिती नवी नाही. आता तिसऱ्या लाटेची अर्थात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणाची धास्ती वाढली आहे. त्यामुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आधीच सचेत केले आहे. सोबतच कोविड प्रोटोकॉलच्या कठोर अंमलबजावणीचे सूतोवाचही केले असल्याने जल्लोषावर निर्भर असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
पालकमंत्र्यांनी आधीच दिला दम
ख्रिसमस व ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आयोजन होणार नाही तसेच सक्तीने कोविड प्रोटोकॉलचे पालन होईल, यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच पोलीस विभागातर्फे संबंधित प्रतिनिधींना सूचना देण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.
थर्टी फर्स्टला ४० ते ५० कोटींची उलाढाल
कोरोना लॉकडाऊनमुळे मंदावलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट, ऑर्केस्ट्रा, सभागृह तसेच केटरर्सला आता कुठे संजीवनी मिळायला लागली होती. उत्सवात या व्यावसायिकांच्या कमाईत तिप्पट-चौपटीने वाढ होत असते. इतर दिवशी १० ते १५ कोटी रुपयांची हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये होणारी उलाढाल थर्टी फर्स्टच्या दिवशी ४० ते ५० कोटींवर जाते. मात्र, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार हॉटेल व रेस्टॉरंट चालकांच्या कमाईला ग्रहण लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा आयोजनाच्या जाहिराती दिसेनात
दरवर्षी थर्टी फर्स्टच्या आयोजनाच्या जाहिराती मोठमोठ्या हॉटेल्स व इव्हेंट ऑर्गनायझर्सकडून केल्या जातात. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही त्या जाहिराती दिसेनाशा झाल्या आहेत. काही हॉटेल्सकडून गुपचूप पद्धतीने आयोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काळात शासनाच्या निर्देशांनुसारच या आयोजनाचे भविष्य ठरणार आहे.
सरकार अलर्ट आहे आणि आम्हीही
पहिल्या व दुसऱ्या लाटेचा महाभयंकर धोका सगळ्यांनी बघितला आहे. व्यावसायिकांनी तर तो पचवला आहे. त्यामुळे, कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन केले जात आहे. आगामी काळात सगळ्यांनीच सजग राहणे गरजेचे असून, सरकार अलर्ट व ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, व्यवसायावर निर्बंध नको पडायला, अशी अपेक्षा आहे.
- अमित बाम्बी, सचिव - नागपूर ईटररी असोसिएशन
जीव महत्त्वाचा, जल्लोष तर होतच राहील
कोरोना संक्रमणाची पहिली व दुसरी लाट अनुभवली आहे. अनेकांनी आप्त गमावले. आनंदासाठी काही तरी जल्लोष महत्त्वाचा असतो. मात्र, त्यासाठी संकट पार करावे लागणार आहे. जल्लोष होतच राहील. आधी जीव वाचवणे महत्त्वाचे ठरेल.
- राेशन झाडे, तरुण
............