लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - रस्त्यारस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त दिसत असल्याने अनेकांनी थर्टी फर्स्टची व्यवस्था आपल्या घरीच करून घेतली. मद्याच्या नशेत आकाशात उडू पाहणारे अनेक तारे यावेळी जमिनीवरच राहिले. त्यामुळे पहिल्यांदाच कुठे हाणामारी आणि गंभीर गुन्हे घडले नाहीत.
थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेकजण दारूच्या नशेत हुल्लडबाजी करतात. त्यामुळे अपघात, हाणामारी, वाद होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू असल्याने रात्री ११ नंतर कोणत्याही ठिकाणी पार्टी अथवा गर्दी करता येणार नाही. असे केल्यास कडक कारवाईचा ईशारा पोलिसांनी दिला होता. नुसता इशाराच नव्हे, तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपासूनच तीव्र करण्यात केली होती. रात्री सीपी टू पीसी असे सुमारे ३ हजार पोलीस नागपूरच्या रस्त्यावर होते. स्वत: पोलीस आयुक्त अमितेशकुमार ठिकठिकाणचा बंदोबस्त तपासत होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहून अनेकांनी घरच्या घरी, आवारात, सोसायटीत आणि छतावरच थर्टी फर्स्टची पार्टी आयोजित केली. घरूनच मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले.
५४३ गुन्हेगारांची झाडाझडती
पोलिसांनी शहरातील विविध भागात, झोपडपट्टयात शिरून १७५ हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांसह एकूण ५४३ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. ४४ हॉटेल्स, लॉज, बार आणि ढाबे तपासले. ४० तडीपारांचीही तपासणी केली, तर २१४८ वाहनांची तपासणी करून ८४४ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. २९ वाहने जप्त करण्यात आली. वेगवेगळ्या कलमानुसार ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, तर एका गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त करून प्रतिस्पर्धी गुन्हेगाराची हत्या करण्याचा त्याचा डाव उधळून लावण्यात आला. दोन नायलॉन मांजा विक्रेत्याविरुद्धही कारवाई करण्यात आली.