राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणूक विभागाने जनजागृती करूनही लोकसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान होऊ शकलेले नाही. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील थोडेथोडके नव्हे, तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदार मतदानापासून लांब राहिले. हे मतदार देशभक्त नाहीत का, मतदान प्रक्रियेबाबत एवढी उदासीनता असण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या मतदारसंघात १९ लाख १४ हजार ७८५ एकूण मतदार आहेत. सर्व मतदारांनी मतदान करणे सक्तीचे नसले तरी सक्षम लोकशाहीसाठी गरजेचे होते. त्यामुळेच शंभर टक्के मतदानाचा आकडा गाठण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती केली होती. प्रत्यक्षात पाच वर्षापूर्वी झालेल्या ५८ टक्के मतदानापेक्षा फक्त तीन अंकाने मतदानाची टक्केवारी वाढू शकली. ६१.०९ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाने जाहीर केली आहे. गेल्या पाच वर्षात देशभक्तीची एक ‘वेगळी’ चर्चा यवतमाळ-वाशिमच नव्हेतर संपूर्ण देशभरात सुरू आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्याची जशी टूम आली, तशीच ‘आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र इतरांनी देण्याची गरज नाही’, असे दणक्यात सांगणाºयांचीही संख्या वाढली. मग देशभक्तीचा ठेका घेणाºया या भारतीयांना लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे का जीवावरचे ओझे वाटले? हा प्रश्न आहे.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य टाळले.मतदानासाठी युद्धभूमीवर जाण्याची गरज नव्हती, हाती बंदूक घेण्याची गरज नव्हती, तोंडाची वाफ गमावून विरोधकांवर टीका करण्याची गरज नव्हती. गरज होती ती फक्त स्वाभिमानाने जाऊन योग्य उमेदवाराला मत देण्याची. पण सोशल मीडियात देशभक्ती फारवर्ड करणाºयांनी हे साधे राष्ट्रीय कर्तव्य बजावले नाही.का टाळले मतदान?उन्ह खूप होते, काय करायचे मतदान करून? कोणीही निवडून आले तरी काय फरक पडतो?- मी नोकरीसाठी बाहेरगावी असतो, कसे मतदान करणार? मतदार यादीत नावच सापडले नाही. मतदान टाळण्याची अशी अनेक कारणे सांगितली जात आहेत.