नागपूर : आताच्या काळात सत्ताधारी विरोधक एकमेकांविषयी चांगले बोलले की त्याची बातमी होते, एवढी मतभिन्नता पक्षांमध्ये रुजली आहे. समाजमाध्यामांवर उठलेली ट्रोल धाड असो की, एकमेकांच्या समर्थकांनी काढलेल्या उखाळ्या पाखाळ्या असोत. वैचारिक विरोधाची पातळी थेट वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत कधी येऊन ठेपली हे महाराष्ट्राला कळलेही नाही. अशा स्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेतृत्व असलेल्या दादासाहेब कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळ्याला विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात हजेरी लावणे व या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनी भूषविणे ही सुखद घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याचे आयोजन भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले, त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्रातील सुसंस्कृत परंपरेचे दर्शन घडलेच; पण ही परंपरा अबाधित राहावी, पुढेही संक्रमित राहावी, अशी अपेक्षा अनेकांच्या मनात उमटणे साहजिकच आहे.
सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा आपल्या राज्याला आहे. एकमेकांच्या विरोधात घणाघाती आरोप केल्यानंतर समोरासमोर आल्यावर त्या आरोपांमुळे कटुता न येऊ देता एकमेकांचा सन्मान करणारी अनेक उदाहरणे आहेत. फ्रेंच तत्त्वज्ञ व्होल्टेअरच्या विधानातच सांगायचे झाले तर 'तुमच्याशी माझे मतभेद असले तरी तुमचे मत मांडण्याचा तुमचा अधिकार जपण्यासाठी मी प्राणपणाने लढेन' अशा लोकशाही तत्त्वाचा पुरस्कार राज्यातील अनेक नेत्यांनी अनेक वेळा केल्याचे दिसले. अलीकडच्या काळात मात्र ही परंपरा हरवली आहे.
ज्यांच्या अभिवादनासाठी हा सोहळा झाला त्या दादासाहेबांनीही विरोधी विचाराचा नेहमीच सन्मान केल्याचे अनेक दाखले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो हे समीकरण अलीकडच्या काळातच रूढ झाले असे नाही. १९५६ मध्ये देशात जेव्हा भाषावर प्रांत रचना झाली व १९५७ मध्ये त्यावेळच्या द्विभाषिक मुंबई राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेस पक्षाचे पाणिपत केले. त्यावेळी मुंबईत काँग्रेसचे यशवंतराव चव्हाणांचे सरकार टिकवायचे तर ज्या विदर्भातून पक्षाचे ५४ आमदार निवडून आले त्या विदर्भाला महाराष्ट्रात कायम ठेवणे काँग्रेसची गरज होती. या आमदारांचे नेते होते चंद्रपूरचे दादासाहेब कन्नमवार. दादासाहेब हे वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते होते, त्यामुळे त्यांचे मन वळविण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी शब्द टाकला व कन्नमवारांनी आपली भूमिका बाजूला ठेवत विदर्भाची ताकद संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली. पुढे हेच दादासाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री होणारे पहिले विदर्भपुत्र ठरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी हीच आठवण सांगून दादासाहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख नव्या पिढीसमोर ठेवला. 'मी बदल्याचे नव्हे, तर बदलाचे' राजकारण करण्यासाठी आलो आहे, अशी ग्वाहीच फडणवीस यांनी दिली होती. त्या दिशेने पडलेले हे पाउलही म्हणता येईल. ज्या मूल तालुक्याचे दादासाहेब भूमिपुत्र होते त्याच तालुक्याचा वारसा व पदांची तीच परंपरा फडणवीस यांना मिळाली आहे, त्यामुळे दादासाहेबांसारख्या मोठ्या उंचीच्या नेत्याच्या स्मरणाने ही पंरपरा पुन्हा वृद्धिंगत होणे अधिक औचित्यपूर्ण ठरत आहे. फक्त ही परंपरा एका सोहळ्यापुरतीच राहू नये, इतकेच !