नागपूर : मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रभरात जो घोळ निर्माण झाला असून त्याचे परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागत आहे. त्यासाठी केवळ उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे ते म्हणाले.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीमुळे महाराष्ट्राला आज हे दिवस पाहावे लागत आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यावेळी अस्तित्वात असलेले मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडता आली असती. परंतु, तेव्हा त्यांनी काहीच केले नाही.
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर बावनकुळे म्हणाले, ही आगच उद्धव ठाकरे यांनी लावली आहे. हा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टात होता तेव्हा वडेट्टीवार त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यास सर्वांनी साथ दिली पाहिजे. भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जी पावलं उचलली आहेत. जे प्रयत्न केले जात आहेत, त्यास भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे निश्चित करण्यात आले असंही त्यांनी सांगितले.