नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप सरकारने औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतराच्या निर्णयालाही स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली.
हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली. गेली दोन दिवस राऊत हे नागपूर दौऱ्यावर असून, येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. उद्धव ठाकरे यांच्याशी माझी याबाबत चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरून उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचे खरे असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे.
उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसेच कोणाचीही पर्वा न करता हिमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. हे निर्णय बदलून काय साध्य केले हे फडणवीस यांना विचारायला हवे, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एका बाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हा निर्णय बदलला. आता औरंगजेब तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधिर झालाय असा घणाघात त्यांनी केला.
संसदेत आता तोंडावर चिकटपट्ट्या बांधून जावे लागणार
- संसदेत नियम आणलाय की काही शब्द वापरायचे नाही. स्वत:चे डाग पुसण्यासाठी हे केले आहे. संसदेत यापुढे काहीच करता येणार नाही. हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या बांधून आम्हाला जावे लागणार आहे. या देशात आणीबाणीपेक्षा जास्त भयानक स्थिती आहे. आणीबाणीत सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतला. आम्ही आणीबाणी विरोधात लढतोय. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल, असा चिमटाही त्यांनी घेतला.
मुख्यमंत्री शिंदेंना टोला
- चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात बऱ्याच गंमती-जमती राज्यात पहायला मिळत आहेत. यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री काय बोलणार, असा टोलाही राऊत यांनी लगावला.