नागपूर : यंदाच्या माेसमात जाेरदार झालेल्या पावसाने चांगलेच थैमान घातले हाेते. पाऊस जाेरात झाला, त्याप्रमाणे हिवाळ्यात थंडीही जाेरात पडेल, असे भाकीत हवामान तज्ज्ञांनी केले हाेते. मात्र, कडाक्याची तर साेडाच; पण थंडी आली कशी अन् गेली कशी, असेच म्हणण्याची वेळ आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे आणि गारठा जाणविण्याऐवजी उष्णताच जाणवत आहे. पुढचे काही दिवसही पारा घटण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे यंदाची थंडी आता संपल्यात जमा आहे, असा अंदाज व्यक्त हाेत आहे.
विदर्भ हा उष्ण कटिबंधिय प्रदेश आहे. हिवाळ्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा प्रभाव असताे. १९९६ साली जानेवारीत रात्रीचा पारा ३.९ अंशापर्यंत खाली घसरला हाेता. डिसेंबर आणि जानेवारीचा महिना कडाक्याच्या थंडीतच जाताे. यंदाच्या माेसमात मात्र असे चित्र दिसले नाही. दाेन महिन्यांत केवळ पाच दिवस थंडीचा तडाखा जाणवला. पहिल्यांदा ९ डिसेंबर राेजी पारा १० अंशाच्या खाली गेला हाेता. त्यानंतर ते १२ ते १५ अंशाच्या आसपास हाेते. यानंतर ८ जानेवारीला अचानक तापमानात माेठी घसरण झाली व ते ८ अंशावर पाेहोचले. या दिवशी गाेंदियात ६.८ अंश तापमान हाेते, जे दशकभरातील सर्वात कमी हाेते. ८ व ९ जानेवारीला विदर्भातील सर्वच शहरात गारठा वाढला हाेता. पुढचे दाेन-तीन दिवस पारा १० ते १२ अंशाच्या आसपास राहिला. त्यानंतर मात्र पारा १३.९ अंशाच्या सरासरीच्या वरच राहिला.
तज्ज्ञांच्या मते, यावर्षी उत्तरेकडून येणारे थंड वारे त्यांची दिशा भरकटले. सरळ दक्षिणेकडे न वाहता बंगालच्या खाडीकडे प्रवाहित झाले. उत्तर भारतात सातत्याने निर्माण हाेत असलेल्या पश्चिमी झंझावातानेही थंड वाऱ्याची दिशा बिघडली. दुसरीकडे जानेवारी महिन्यात बंगालचा उपसागर आणि अरबी सागरात तयार झालेले उष्ण समुद्री वारे विदर्भ व मध्य भारतातून चक्रीय दिशेने वाहत आहेत, ज्यामुळे थंड वाऱ्यांना राेखणारी भिंत तयार झाली. त्यामुळे नेहमी वाटणारी कडाक्याची थंडी जाणवलीच नाही.
सध्या नागपूरचे किमान तापमान १५ अंशावर आणि कमाल तापमान ३१ अंशावर आहे. पुढचे सात दिवस ते अनुक्रमे १७ अंश व ३२ अंशाच्या आसपास राहणार आहे. पुढे फेब्रुवारी महिना हा संक्रमणाचा काळ असताे आणि पारा वाढायला सुरुवात हाेते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते थंडी ओसरलीच आहे, असे समजावे.