वानाडाेंगरी : राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदीसाेबतच लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या सर्व बाबींची काटेकाेर अंमलबजावणी व्हावी म्हणून हिंगणा व एमआयडीसी पाेलिसांनी दुकानांसाेबतच राेडवर फिरणाऱ्या अथवा कामानिमित्त जाणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांची कसून तपासणी करायला सुरुवात केली आहे.
अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा, खरेदी करतेवेळी दुकानांसमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने वेळावेळी केले जात असून, याची पडताळणी करण्यासाठी पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून नागरिकांची तपासणी करायला सुरुवात केली आहे. पाेलीस मास्कसाेबतच नागरिकांकडील ओळखपत्र तपासून बघत आहेत. पाेलीस राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही विचारणा करीत आहेत. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत की नाही, याचीही पडताळणी केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, भीती न बाळगता लसीकरण करवून घेण्याचे आवाहनही पाेलीस प्रशासनाच्यावतीने केले जात आहे. ही माेहीम ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर, एमआयडीसीचे देवकुमार मिश्रा यांच्यासह अन्य पाेलीस कर्मचारी राबवित आहेत.