लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात तसेच वर्धा जिल्ह्यातील काही भागांत गेल्या वर्षी आकाशातून पडलेले तप्त धातूचे साहित्य हे चिनी उपग्रहाचे तुकडे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्राे) आणि अमेरिकेच्या चंद्रा ऑब्झर्व्हेटिव्ह संस्थेने वर्षभरानंतर याबाबत खुलासा केला. इस्राेने याबाबतचा अहवाल राज्य शासनाला साेपविला.
गेल्या वर्षी २ एप्रिलला रात्री विविध भागांत आकाशातून धातूचे साहित्य पडल्याची घटना घडली. चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात लाडबाेरी येथे धातूची माेठी रिंग आणि फुटबॉलच्या आकाराचे सिलिंडर अतिशय उष्ण अवस्थेत आकाशातून कोसळले होते. यासह वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यातही असे धातूचे भाग काेसळल्याची घटना घडली होती.
तज्ज्ञांकडून निरीक्षण - १५ एप्रिल २०२२ रोजी इस्त्रोचे वैज्ञानिक एम. शहाजहान, मयूरेश शेट्टी यांनी लाडबोरी गावाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. - सिंदेवाही ठाण्यातील त्या अवकाशी वस्तूंची पाहणी करून त्या निरीक्षणासाठी पाठविल्या होत्या.
काय आहे निष्कर्ष ?
-इस्रोने अवकाशीय वस्तूंचे निरीक्षण केले असता चीनच्या लाँगमार्च सॅटेलाइचे ते तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. - चीनने हा उपग्रह अवकाशात सोडला होता. त्याचे तुकडे बंगालच्या खाडीत पडणे अपेक्षित होते. - उपग्रहाचे तुकडे महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात कोसळले. - इस्राेने हा अहवाल राज्य व केंद्र सरकारकडे साेपविला आहे.