रामटेक तालुक्यातील रमजान, साेनपूर, चिकनापूर गावे
कैलास निघोट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : रामटेक तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये काेराेना रुग्ण आढळून येत असतानाच कमी लाेकसंख्या असली तरी रमजान, साेनपूर व चिकनापूर या तीन गावांनी मात्र काेराेनाला वेशीवर राेखण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, ही तिन्ही गावे आदिवासीबहुल व तीन वेगवेगळ्या गटग्रामपंचायतींमधील आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व आराेग्य विभागाची मदत व नागरिकांचा विश्वास यामुळे हे शक्य झाल्याची माहिती या तीनही गावांच्या सरपंचांनी दिली.
सालई गटग्रामपंचायतमधील रमजानची लाेकसंख्या १६०, पिंडकापार गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साेनपूरची लाेकसंख्या ९९ तर टांगला गटग्रामपंचायतमधील चिकनापूरची लाेकसंख्या ११० आहे. या तिन्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या इतर गावांमध्ये काेराेनाचे रुग्ण आढळून आले हाेते. मात्र, तिन्ही गावांमधील प्रत्येक व्यक्तीने ग्रामपंचायत प्रशासन व आराेग्य विभागाने वेळावेळी दिलेल्या सूचना व उपाययाेजनांचे काटेकाेर पालन केले.
गावात काेराेनाचा शिरकाव हाेऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर काही बंधने घातली हाेती. त्यासाठी गावाच्या सर्व सीमा सील केल्या हाेत्या. गावात येण्यापूर्वी प्रत्येकाला काेराेना टेस्टचा निगेटिव्ह रिपाेर्ट अनिवार्य केला हाेता. गावात साेडियम हायपाेक्लाेराईची नियमित फवारणी करून गावाचे निर्जंतुकीकरण, संपूर्ण स्वच्छता, प्रत्येकाने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक करणे या उपाययाेजनांवर विशेष भर दिला हाेता. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घराेघरी जाऊन नागरिकांना विश्वासात घेत जनजागृती केली हाेती. या काळात मनात भीती असली तरी प्रत्येकाने स्वत:साेबत इतरांची काळजी घेतल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया या तिन्ही गावांमधील नागरिकांनी व्यक्त केली.
...
काेराेनामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली हाेती. गावाला काेराेना संक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी आधी नागरिकांना विश्वासात घेतले आणि नंतर त्यांना उपाययाेजना सांगून त्यांचे पालन करायला लावले. नागरिकांनीही त्याचे काटेकाेर पालन केल्याने हे शक्य झाले.
- राजेश भोंडेकर,
सरपंच, सालई (रमजान)
...
दुसऱ्या लाटेत टांगला गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तीनपैकी दाेन गावांमध्ये काेराेना रुग्ण आढळून आले हाेते. मात्र, चिकनापूर येथील नागरिकांनी विशेष काळजी घेत गावात काेराेनाचा प्रवेश हाेऊ दिला नाही. नागरिकांच्या प्रशासनावर असलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.
- सुधाकर मडावी,
माजी सरपंच, टांगला (चिकनापूर)
...
नागरिकांच्या मनातील काेराेनाची भीती दूर करण्यासाठी आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांची विशेष मदत झाली. यात ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी व आशासेविकांनी सहकार्य केले. नागरिकांनी या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून काळजी घेतल्याने व उपाययाेजनांचे पालन केल्याने हे शक्य झाले.
- कुसुम शेरकुरे,
सरपंच, पिंडकापार (सोनपूर)
...
रमजान, सोनपूर व चिकनापूर या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, आशासेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडली. या तिन्ही गावांमधील नागरिकांनी प्रशासनाला वेळावेळी योग्य सहकार्य केले. येथील नागरिकांचा समजूतदारपणा व सहकार्याची भूमिका आदर्श ठरली.
- डॉ. चेतन नाईकवार,
तालुका आरोग्य अधिकारी, रामटेक