लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्चशिक्षणासाठी त्या घर, देश यापासून दूर असतानाच स्वप्नातही विचार केला नाही असे संकट ओढविले. ‘कोरोना’चा कहर सुरू असताना त्या वातावरणात राहणे म्हणजे क्षणाक्षणाला परीक्षा होती. ना वसतीगृहाबाहेर निघणे, ना कुणाशी थेट संपर्क करणे. निराशा वाढत होती अन् भितीचे प्रमाणदेखील. अखेर भारत सरकारच्या प्रयत्नांतून त्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला अन् जीवघेण्या वादळातून सुखरुप बाहेर पडल्याचीच अनुभूती आली.कोरोना आजारामुळे चीनमध्ये रोज मृत्यू होत असून संपूर्ण जग त्याच्या दहशतीत आहे. या परिस्थितीत विदर्भातील चार वैद्यकीय विद्यार्थिनी चीनमध्ये अडकल्या होत्या. दोन्ही देशांतील सरकारच्या मदतीमुळे त्या बुधवारी आपापल्या घरी परतल्या. त्यांनी प्रशासनाला कोरोनाचे थरारक अनुभव सांगितले.प्राची भालेराव (अकोला), सोनाली भोयर (गडचिरोली), कोमल जड्डेवार (नांदेड) व अन्य एक विद्यार्थिनी चीनमधील वुहान शहरातल्या हुबेई युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी येथे वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. कोरोना आजाराची साथ पाहता त्यांना जानेवारीपासूनच वसतिगृहाच्या खोल्यांमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. त्यांनी तब्बल तीन आठवडे वसतिगृहात काढले. त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांना १७ दिवस स्वतंत्र परिसरात ठेवून सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्यात करण्यात आल्या. कोरोनाची लागण झाली नसल्याचे अहवाल आल्यानंतर सर्वांना आपापल्या घरी जाण्यासाठी मुक्त करण्यात आले. चीनमध्ये कोरोना आजार रोज नागरिकांचा बळी घेत आहे. तेथील मेट्रो, विमानसेवा इत्यादी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. कुणीही मोकळेपणाने फिरू शकत नाही, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली.त्यांनी दोन्ही देशांतील प्रशासनाने घेतलेल्या काळजीची प्रशंसा केली. वसतिगृहात बंदिस्त असताना त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक वस्तू व सुविधा पुरविण्यात आल्या. १ फेब्रुवारी रोजी भारतीय नागरिकांच्या पहिल्या बॅचला देशात परतण्याची परवानगी देण्यात आली. त्यात या विद्यार्थिनींचाही समावेश होता. भारतात परतल्यानंतर सर्वांना १७ दिवस इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. दरम्यान, सरकार व सेनेने सर्वांची चांगली काळजी घेतली. त्यांच्यासाठी इनडोअर जिम, कॅरम, टेबल टेनिस, चेस इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे अहवाल आल्यानंतर सरकारने प्रत्येकाला त्यांच्या घरी सोडून देण्याची व्यवस्था केली, असे विद्यार्थिनींनी सांगितले.
चीनमधील ते तीन आठवडे थरकाप उडविणारे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:28 AM
विदर्भातील चार वैद्यकीय विद्यार्थिनी चीनमध्ये अडकल्या होत्या. दोन्ही देशांतील सरकारच्या मदतीमुळे त्या बुधवारी आपापल्या घरी परतल्या. त्यांनी प्रशासनाला कोरोनाचे थरारक अनुभव सांगितले.
ठळक मुद्देत्यांनी अनुभवला ‘कोरोना’चा कहर वुहानमधील विद्यार्थिनींनी सांगितले थरारक अनुभवजानेवारीपासून होत्या बंदिस्त वातावरणात