लोकमत न्यूज नेटवर्ककामठी : जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील बंद घरात आढळलेल्या दोन बहिणांचा मृत्यू आजारपण आणि उपासमारीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज कामठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल येत्या सात दिवसात देणार असल्याची माहिती डॉ.एस.के.वाघमारे यांनी दिली.बुधवारी दालओळी नंबर २ येथे एका बंद घरात पद्मा नागोराव लवटे (६०) आणि कल्पना लवटे (५०) यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले होते. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एस.के. वाघमारे यांनी शवविच्छेदन करून दोघींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यानंतर राणीतलाव मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रेखा विजय लवटे यांच्या तक्रारी वरून जुनी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जी.पाटील करीत आहेत.
दहा वर्षापूर्वी झाली होती अखेरची भेट
या घटनेची माहिती मिळताच मृत पद्मा व कल्पनाच्या धाकट्या बहिणी सुनिता नरेंद्र कंटाळे (३५) रा. इंदोर आणि अर्चना विजय इल्लापुरकर (४०) रा. बुलडाणा गुरुवारी दुपारी १२ वाजता सुमारास कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना जुनी कामठीचे ठाणेदार विजय मालचे यांनी पद्मा व कल्पना संदर्भात माहिती विचारली असता कल्पना ही मानसिक आजाराने ग्रस्त होती तर पद्मा मिळेल ते काम करून घरचा उदरनिर्वाह करायची असे त्यांनी सांगितले. दहा वषापूर्वी आई-वडीलांच्या मृत्यूनंतर आज प्रथमच कामठीत आल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले.