नागपूर : ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केले, सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे.. मात्र, ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांनी नव्या सहकार खात्याचे स्वागतच केले आहे. अमित शहा खूप आधीपासून सहकार चळवळीत असून त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शनिवारी नागपुरात आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मध्यावधी होईल की नाही याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिंमत करणार नाही. कारण त्यांना माहीत आहे निवडणूक झाली तर ते धराशायी होतील. कारण या सरकार विरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत विचारणा केली असता मुंढे यांनी कालच स्पष्टीकरण दिल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
भास्कररावांना अध्यक्षपदासाठी शुभेच्छा
- भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी शुभेच्छा आहे, मात्र पदावर गेल्यावर त्यांनी किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे. जर आघाडीच्या तीन पक्षामध्ये अध्यक्षपदाबद्दल एकमत राहिले असते तर आता पर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.
फडणवीस म्हणाले...
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, मी हरी नरके यांच्याशी काय चर्चा करू. त्यांचे बॉस छगन भुजबळ यांच्यासोबत मी या विषयावर अकॅडमिक मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे.
- पूर्व विदर्भात ज्या तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहे त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहे..
पीक कर्जाचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की फक्त १८ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन बँकांना कर्ज वाटपबद्दल निर्देश द्यावे.