नागपूर : वनविभागात धडाडीने काम करणाऱ्या आरएफओ दीपाली चव्हाण यांना त्रास देण्यासाठी त्यांच्याविरुद्ध खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल करण्यात आल्या. चव्हाण यांना जाणूनबूजन त्रास देण्याचे प्रयत्न वनविभागातील अधिकाऱ्यांच्याच इशाऱ्यावरून झाले. अशा सर्व खोट्या ॲट्रॉसिटी प्रकरणाची आणि ते दाखल करणाऱ्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने पत्रकार परिषदेतून केली आहे.
अ.भा. मराठा महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी कविता भोसले, नागपूर महानगर अध्यक्ष दिलीप धंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, चव्हाण यांनी वनविभागात धडाडीने काम केले. तीन गावांचे पुनर्वसन केले. तस्करांना आळा घातला, तरीही शिवकुमार त्यांना त्रास द्यायचा. त्यांना जाणीवपूर्वक खोट्या ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये अडकविण्यात आले. वकिलाची फी आणि कोर्टकचेरीच्या कामात त्यांचा पगार खर्च व्हायचा, ही बाबही त्यांनी सुसाईड नोटमध्ये मांडली आहे. वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांना सहकार्य मिळाले नाही. खासदार नवनीत राणा यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी वनमंत्र्यांना माहिती दिली. मात्र फायदा झाला नाही. जागतिक महिला दिनाच्या दिवशी दीपाली चव्हाण यांच्यासह अन्य महिला आरएफओंनी कामाच्या ठिकाणी लैंगिकता प्रतिबंधात्मक समिती स्थापन करण्याची मागणी केली. महिलांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याने शिवकुमार व रेड्डी यांच्याविरुद्ध ३०६, १०१, ३१३ या कलम लावाव्यात, त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला शारदा गावंडे, अखिल पवार, मनोहर गावंडे आदी उपस्थित होते.