नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे विद्यमान सदस्य व विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचे तिकीट कापण्यात आले. पक्षाने पाठविलेल्या उमेदवारांच्या यादीत निधान यांच्या गुमथाळा सर्कलमधून योगेश डाफ यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु निधान यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गुमथाळा जिल्हा परिषद सर्कलसाठी सोमवारी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत अनिल निधान यांचे नाव आहे. त्यांच्या नावापुढे राजकीय पक्षाचे नाव भाजप असे लिहिले आहे. पक्षाने दिलेला उमेदवार व निधान यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज लक्षात घेता भाजपमध्ये मोठी बंडाळी उफाळून आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे याच सर्कलमधून कैलास महल्ले यांनीही भाजपकडून अर्ज भरला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करताना स्पष्ट केले की, निधान यांनी स्वत: उमेदवारी नाकारली. पण निवडणूक विभागाच्या यादीत निधान यांचा अर्ज बघून कामठी विधानसभा क्षेत्रात चांगलीच धुसफुस असल्याचे दिसते आहे.
अनिल निधान हे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आले होते. भाजपला या निवडणुकीत केवळ १५ जागा मिळाल्या होत्या. ज्येष्ठ सदस्य असल्याने पक्षाने त्यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची धुरा सोपविली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये निवडणूक आयोगाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आणि पोटनिवडणुकीत उमेदवारी देताना भाजपनेही त्यांना संधी नाकारली. त्यांच्या जागी योगेश डाफ या नवीन चेहऱ्याला मैदानात उतरविले. यासंदर्भात अनिल निधान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला होता.