लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पावसातही आपल्या मागण्या रेटून धरल्या. पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडले होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाचे निवेदन घ्यायला कुणीच मंत्री नव्हता. यामुळे पोलिसांनी शिष्टमंडळाला सोमवारी येण्यास सांगितले.जुन्या पुस्तके विक्रेत्यांसाठी जागा द्याजुनी पुस्तके विक्रीसाठी शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेने भरपावसातही विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चात पन्नासच्यावर पुस्तक विक्रेते सहभागी झाले होते. पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडल्याने मोर्चाचे शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून निवेदन देणार आहे.यशवंत स्टेडियम धंतोली येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष नरेश वाहणे यांनी केले. मोर्चाला मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट जवळ पोलिसांनी अडविले. पाऊस सुरू असतानाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झालीत. ‘लोकमत’शी बोलताना नरेश वाहणे म्हणाले, विद्यार्थी, पुस्तकप्रेमी यांना दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या व्यवसायाचा फायदा अनेकांना झाला आहे. परंतु विकासाच्या नावाखाली मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट मार्गावरील जुन्या पुस्तक विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय हिरावून घेतल्याने त्याच्यावर उपासमारीची पाळी आली. शासनाने पर्यायी जागा देण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत, परंतु दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनीधी आश्वासन देऊन तोंडाल पाने पुसतात. मात्र आता हे सहन केले जाणार नाही. पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही वाहणे यांनी दिला. मोर्चात शीतल गोडबोले, निकेश फुलझेले यांच्यासह पुस्तक विक्रेत्यांचा सहभाग होता.अमरावती येथून आला मोर्चा : धरणग्रस्तांनी मांडली आपली व्यथाअपर वर्धा धरणग्रस्तांना वाढीव जमिनीचा मोबदला देण्यात यावा व शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी अमरावती येथून अपर वर्धा संघर्ष समितीचा मोर्चा शुक्रवारी विधिमंडळावर धडकला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केले. महाजन यांनी निवेदन संबंधित खात्याकडे वळते करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.संघर्ष समितीचे संयोजक गजानन ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात दहावर मोर्चेकरी नव्हते. परंतु पावसात भिजत हे मोर्चेकरी नारे देत टेकडी पार्इंटवर पोहचले. ‘लोकमत’शी बोलताना ठाकरे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे पोट शेतीवर होते त्यांची शेती अपर वर्धा धरणात गेली. हाती शेतीच नसल्याने उपसमारीची पाळी आली. शासनाचे आमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला, मोर्चात लोक कमी असले तरी आमची मागणी आमच्या जीवनाशी संबंधित आहे. शासनाने धरणग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी किंवा २० लाख रुपये द्यावे, एवढीच आमची मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. शिष्टमंडळात मुन्नाभाई रायचुरा, शरद नागमोते आदींचा सहभाग होता.