उपक्रमाचा शुभारंभ : प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरासमोर झाडनागपूर : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अजनी येथील लोहमार्ग पोलीस मुख्यालयात १ हजार गुलमोहराची झाडे लावण्यात येणार आहेत. लोहमार्ग पोलीस अधीक्षक शशिकांत माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करून आज या उपक्रमाला शुभारंभ करण्यात आला.वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर आणि सामान्य नागरिकांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ हवा मिळून त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी लोहमार्ग पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने यासाठी १ हजार गुलमोहराची झाडे उपलब्ध करून दिली. गुरुवारी लोहमार्ग पोलीस अधीक्षक शशिकांत माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पी. के. बाडीवाले, मानव संसाधनचे पोलीस निरीक्षक गोपाल यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश तायडे, राखीव पोलीस निरीक्षक सुरेश गवई यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. लोहमार्ग पोलीस मुख्यालय परिसरात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरासमोर एक झाड लावण्यात येणार आहे. उपक्रमाला बीव्हीजी कंपनीचे मुंडले यांनी सहकार्य केले. गुलमोहराची झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल लोहमार्ग पोलीस अधीक्षक शशिकांत माने यांनी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)
लोहमार्ग पोलीस मुख्यालयात लावणार एक हजार झाडे
By admin | Published: July 25, 2014 12:50 AM