लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या शहरीकरणाच्या धामधुमीत विवाह, मुंज, वाढदिवसापासून ते चौदावीच्या कार्यक्रमांसाठी सर्वसुविधांनी युक्ती सेलिब्रेशन हॉल्स, लॉन्सची रचना झाली आणि म्हणता म्हणता हा एक मोठा उद्योग झाला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वावटळीत हा उद्योग पार बुडाला आणि या उद्योगावर निर्भर लहानमोठे व्यापारही धुळीस मिळाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आणि अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पुन्हा एकदा वाढत्या प्रकोपात आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या धास्तीने भेडसावलेले हे उद्योजक थेट शासनाच्या विरोधात उभे झाले आहेत.
भटकंती करत असताना शहरात जेवढे सेलिब्रेशन्स हॉल, लॉन्स आढळतील त्या सर्वांच्या द्वारावर शासनाच्या निषेधाचे फलक लागलेले आढळतील. वेडिंग इंडस्ट्री बचाव, असा या फलकांचा सूर आहे. शहरात साधारणत: २५०-३०० हॉल्स-लॉन्स आहेत. या प्रत्येक हॉल्स-लॉन्समध्ये कोणतेही सोहळे आयोजित करण्यासाठी सर्व सुविधांच्या मोबदल्यात लाखो रुपये घेतले जातात. एकाच छताखाली सर्व सुविधा प्राप्त होत असल्याने आयोजकांकडून हे पैसे सहजतेने दिले जातात. या हॉल्स-लॉन्समध्ये आयोजित होणाऱ्या सोहळ्यांवर टेण्ट, डेकोरेशन, बॅण्ड, संगीत, गायक आदी कलाकार, भांडी विक्रेते, गिफ्ट विक्रेते, फुलविक्रेते यांचा व्यवसाय चालत असतो. सोबतीला शेकडो रोजगार. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा सगळा उद्योग-व्यापार मोडकळीस आला आहे. टाळेबंदी आणि सोहळ्यांमध्ये येणाऱ्या आमंत्रितांच्या संख्येची मर्यादा, यामुळे अनेक आयोजक आपले सोहळे रद्द करत आहेत आणि पैसा परत मागत आहेत. अशा तऱ्हेने गेल्या वर्षभरात हजारो कोटींचा हा उद्योग रसातळाला गेला आहे. हॉल्स-लॉन्सवाल्यांना कर्मचाऱ्यांना पगार देणे होत नाहीये. वीज-पाणी बिल वाढतच आहे. अशा स्थितीत सगळेच हतबल झाल्याची स्थिती आहे.
आतापर्यंत ५० लाख रुपये केले परत
टाळेबंदीत अनेकांनी सोहळे रद्द केले. काहींनी तशाच छोटेखानी सोहळे पार पाडले. मात्र, सगळ्यांनाच कमी-जास्त प्रमाणात तर काहींना पूर्णच पैसे परत करावे लागले आहे. शिवाय, नियोजित बुकिंग आल्या नाहीत. गेल्या वर्षभरात साधारणत: ५० लाख रुपयांची बुकिंग परत करावी लागली आहे. कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यावा, व्यवस्थेचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न आहे. त्यातच पुन्हा टाळेबंदीची धास्ती आहेच. स्थिती फार भयंकर झाली आहे.
रवींद्र सुरकर, व्यवस्थापक, जैन कलार समाजभवन, रेशीमबाग