नागपूर - क्रिकेट विश्वातील परंपरागत प्रतिस्पर्धक मानल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी रोमांचक टी-२० सामना बघायला मिळाला. यासामन्या दरम्यान शेवटच्या तीन चेंडूंपर्यंत क्रिकेट रसिकांची उत्कंठा ताणली गेली होती. मात्र, अखेर टीम इंडियाने हा सामना जिंकून भारताला दिवाळीची गोड भेट दिली. तर जिंकण्याची स्थिती असताना सामना गमावणाऱ्या पाकिस्तान संघाने बुकींना ऐन दिवाळीत बरबाद केले. पाकिस्तान जिंकणार, असा अंदाज बांधून बुकींनी नेहमीप्रमाणे डाव टाकला होता. मात्र, ज्या पद्धतीने आजचा सामना झाला ती पद्धत सटोड्यांना (लगवाडी करणाऱ्यांना) लक्ष्मी प्राप्ती करून देणारी ठरली.
विश्व चषक आणि त्यातल्या त्यात भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट बुकींसाठी पर्वणी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट सामना सट्टा बाजारात रेकॉर्डब्रेक करणारा असतो. आज रविवारी हा सामना असल्याने बुकींनी आधीच तयारी करून ठेवली होती. त्यासाठी पंटरसह विविध प्रकारचे अॅप (सॉफ्टवेअर) बुकींनी हाताशी ठेवले होते.
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा दोन्ही टीम मैदानात आल्या. त्यावेळी बुकींनी भारताचा रेट ६० पैसे ठेवला होता. अर्थात भारताच्या बाजुने एक लाख लावल्यास आणि भारत जिंकल्यास ६० हजार रुपये मिळणार होते. पाकिस्तानची पहिली विकेट गेली तेव्हा हा रेट ४० पैशावर आला. त्यानंतर पहिला डाव संपला तेव्हा मध्यभारतातील सट्टा बाजारात दोन ते अडीच हजार कोटींची खयवाडी-लगवाडी झाली होती. उत्तरार्धात सामना रोमांचक मोडवर गेल्यानंतर बुकींनी वेगवेगळी डावबाजी करून सटोड्यांकडून पुन्हा हजारो कोटींची लगवाडी करून घेतली. मात्र, ही डावबाजी बुकींच्या तोंडचे पाणी पळविणारी ठरली. तीन षटकांचा खेळ बाकी असताना भारताची स्थिती चांगली नसल्यामुळे बुकींचे हाैसले बुलंद झाले होते. त्यामुळे मेलबोर्नच्या मैदानावर चेंडू आणि धावांची बरसात होत होती तर बुकी बाजारात लगवाडी खयवाडीच्या रुपात धन बरसत होते. मात्र, सामना संपला तेव्हा अनेक बुकींचे अवसान गळले. मोठमोठे बुकी शेकडो कोटी रुपये हरल्याने कमालीचे अस्वस्थ झाले होते.
असा होता भावफलक -प्रारंभी भारताचा भाव ६० पैसे होता. पाकिस्तानची पहिली विकेट गेली तेव्हा तो ४० पैशावर मध्यंतराच्या वेळी ३० आणि ३५ पैशांवर आला. नंतर पुन्हा भाव वाढला. परंतू, शेवटच्या षटकात भारतावर खयवाडी करणाऱ्या बुकींनी भारताचा भाव केवळ १० पैसे, ९ पैसे दिला. अनेक बुकींनी तर भारतीय संघाच्या बाजुने खयवाडी करण्याचे टाळले.
ते तीन षटकं अन् बाजीगर -जबरदस्त विजयी खेळी करून भारताला दिवाळी भेट देणारा विराट कोहली आजच्या सामन्याचा बाजीगर ठरला. सट्टा लावणाऱ्यांसाठीही तो हिरो ठरला. प्रचंड दडपण निर्माण करणाऱ्या या लढतीत विराटने ५३ चेंडूंवर चार षटकार आणि सहा चाैकाराच्या मदतीने ८२ धावा जोडल्या. शेवटच्या तीन षटकात विराटच्या खेळीमुळेच हा सामना टिम इंडियाला जिंकता आला. विराटच्या दमदार खेळीमुळे पाकिस्तानचा संघचे नव्हे तर देश-विदेशातील बुकीही गारद झाले.