नागपूर : भिशी व ड्रॉच्या नावाखाली एका कंपनीने स्कीम चालवत हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपी सचिन मेश्रामविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सचिन मेश्राम (४०, कोडा सावली, पारशिवणी) याने संकल्प सेल्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून संबंधित स्कीम आणली. १६ महिने दरमहा हजार रुपये भरले, तर शेवटी २० हजार रुपये मिळतील. तसेच ड्रॉमध्ये ज्या व्यक्तीचा क्रमांक लागेल त्याला २० हजार रुपयांचा महाराजा सोफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. याव्यतिरिक्त आणखी तीन स्कीमदेखील होत्या. जर एखादा गुंतवणूकदार एजंट झाला तर त्याला आणखी कमिशन मिळेल, अशी बतावणीदेखील करण्यात आली. जास्त पैसे मिळतील या नादात शुभम उमेश वानखेडे (२८, अयप्पानगर) याने पैसे गुंतविले व तो एजंटदेखील झाला.
शुभमने मेश्रामला १३ गुंतवणूकदार जमवून दिले. मात्र, मेश्रामने एकाचेही नाव ड्रॉमध्ये काढले नाही. १ फेब्रुवारी २०२२ पासून हा प्रकार सुरू होता. १६ महिने पूर्ण झाल्यावर मेश्रामने गुंतवणूकदारांना पैसे व परतावा काहीच दिला नाही, तसेच एजंट्सला पैसेदेखील दिले नाहीत. शुभमसोबतच एजंट झालेल्या इतर गुंतवणूकदारांचे १ कोटीहून अधिक रुपये थकवले. मेश्राम पैसे परत करत नसल्याचे दिसून आल्यावर अखेर शुभमने कपिलनगर पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी सचिन मेश्रामविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.