नागपूर : ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित व मुख्य प्रायोजक ‘प्लास्टो टँक ॲण्ड पाईप’ आणि पॉवर्ड बाय ‘ग्लोकल स्क्वेअर’ प्रस्तुत विदर्भातील सर्वांत मोठ्या नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंद पार्कवर जमा झाले होते.
या लोकप्रिय स्पर्धेचा प्रारंभ ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, नागपूर जिल्हाधिकारी विमला आर., विशाल अग्रवाल, डायरेक्टर आर,सी. प्लास्टो टॅन्क्स अॅन्ड पाईप, डॉ. प्रकाश खेतान, मॅनेजिंग डायरेक्टर, किंग्जवे आदि मान्यवरांच्या हस्ते झाला.
पहाटे साडेपाच्या सुमारास महामॅरेथॉनला सुरुवात झाली. यात तरुण-तरुणी, धावपटू, वृद्ध पुरुष, स्त्रिया असे सर्वच सहभागी झाले होते. सर्वांचा उत्साह ओसांडून वाहत होता. सकाळी साडे पाच वाजता कस्तुरचंद मैदानावरुन महामॅरेथॉनची सुरवात झाली. सुरवातीचा क्षणही अतिशय उत्कंठावर्धन राहिला. निवेदिकेच्या इशाऱ्याकडे व कमानीवरील घड्याळाकडे धावपटूंच्या तसेच उपस्थित क्रीडा रसिकांच्या नजरा खिळून राहिल्या.
काऊंटडाऊन जाहीर करत निवेदिकेने पाच...चार...तीन...दोन... एक... स्टार्ट असे सांगताच २१ किलोमिटर अंतराच्या स्पर्धेला सुरवात झाली. पाठोपाठ पंधरा मिनिटांच्या अंतराने १० किलोमिटर, पाच किलोमिटर आणि तीन किलोमिटर अंतराच्या स्पर्धेतील सहभागी धावपट्टूंना सोडण्यात आले. फ्लॅगऑफ होताच धावपट्टूंनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या ध्येयाकडे धाव घेतली. दोन वर्षानंतर सर्वजण महामॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला.
महामॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी टी-शर्ट, बिब आणि गुडी बॅगचे वितरण करण्यात आले. सकाळपासूनच उत्साह पाहायला मिळाला. टी-शर्ट घेतल्यानंतर अनेकांनी कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसोबत सेल्फी काढून घेतला. एक्स्पोमध्ये धावपटूंसाठी लागणाऱ्या विविध क्रीडा साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते.