नागपूर : बेराेजगारी हा राज्यातील सध्या माेठा विषय असून भरती बंद असल्याने तरुणांमध्ये असंताेष पसरला आहे. एमपीएससीपासून आराेग्यसेवकांपर्यंत विविध विभागांच्या पदभरतीसाठी परीक्षा झाल्या पण अद्याप अशा तरुणांना नियुक्त्या मिळाल्या नाही. अशा पदभरतीच्या मागणीसाठी हजाराे बेराेजगार तरुणांचा महामाेर्चा बुधवारी मुंबईवर धडकणार आहे.
लवकरच विधानसभा निवडणूक लागेल व त्यानुसार आचार संहिता लागल्यास नवीन सरकार बनेपर्यंत हे प्रश्न आधांतरीत राहतील, ज्यामुळे तरुण तरूणींमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या मोर्चात कोविड योद्धे, आरोग्यसेवक, परीक्षा उत्तीर्ण होऊनही अपात्र ठरलेल्या महिला व पुरुष परिचारिका, एमपीएससीद्वारे राज्यसेवा आणि कम्बाईन गट ‘ब’ व ‘क’ परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, प्रकल्पग्रस्त, आदिवासी विभागाच्या जागा भराव्यात यासाठी आदिवासी तरुण या माेर्चात सहभागी हाेतील.
प्रमुख मागण्या :
- आरोग्यसेवक ५० टक्के (पुरुष) पदाची नियुक्ती ताबडतोब देण्यात यावी.
- आरोग्य परिचारिका परीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण झालेल्या जीएनएम व बीएससी उमेदवारांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी.
- कोरोनादरम्यान आरोग्यसेवेसाठी विविध पदावर काम केलेले कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांची नोकरभारती करण्यात यावी.
- आदिवासी बांधवांच्या हक्काच्या १२,५०० जागांची पदभरती प्रक्रिया ताबडतोब सुरु करण्यात यावी.
- राज्य सरकारच्या विविध खात्यांतील पद भरतीच्या जाहिराती तात्काळ काढण्यात यावी.
- राज्यसेवा आणि कम्बाईन गट "ब" व गट "क" जागवाढ करण्यात यावी.
- कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ मध्ये पात्र ठरलेल्या ४१७ अधिकाऱ्यांना ताबडतोब नियुक्त्या मिळाव्यात.
- २०२२ व २०२३ च्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांना एकत्रित ऑप्टींग आउटची संधी देण्यात यावी.
- एमपीएससीने घेतलेल्या विविध परीक्षांचे निकाल ताबडतोब जाहीर करून नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करणे.