‘जनआक्रोश- हल्लाबोल’ मोर्चासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:03 PM2017-12-12T13:03:07+5:302017-12-12T13:13:25+5:30
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकार विरोधात नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश-हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकार विरोधात नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश-हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. काँग्रेस नेते गुलामनबी आजाद व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. मोर्चात जमलेली गर्दी सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारी आहे.
या मोर्चाला शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पार्टी व माकपानेही पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचा मोर्चा दीक्षाभूमी परिसरातून निघाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा धनवटे कॉलेजच्या मैदानावरून निघाला आहे. दोन्ही मोर्चे लोकमत चौकात एकत्र येऊन पुढे झिरो माईल टी पॉर्इंटवर जाहीर सभा होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्यभरातील नेते सहभागी झाले आहेत.
गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांनी या मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून शेकडो गाड्या सकाळी मोर्चेकऱ्यांना घेऊन दाखल झाल्या. ग्रामीण भागातील, शेतकरी, शेतमजूर, महिला मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले आहेत.
सरकार विरोधी बॅनर गगनभेदी घोषणा
मोर्चात केंद्र व राज्य सरकार विरोधातील बॅनर व फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या निनादात, कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणाबाजीत दोन्ही मोर्चे हळुहळु पेढे सरकत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राहुल गांधी यांची अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे मोर्चात पहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथांचे दर्शन
काँग्रेस- राष्ट्रवादींच्या मोर्चात शेतकऱ्याला केंद्रबिंदु मानून त्याच्या व्यथा दर्शविण्यात आल्या आहेत. काही शेतकरी बोंडअळीने नुकसान झालेल्या कापसाच्या बोंडांच्या माळा घालून, डोक्यावर धानाच्या पेंड्या घेऊन तर कुणी संत्र्याच्या माळा घालून मोर्चात सहभागी झाले आहेत. शेतकरी गळफास लावून आत्महत्या करीत आहेत, असे फलकही झळकविण्यात आले आहेत.