नागपूर विद्यापीठ : अनेक जणांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबलीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबली असल्याची बाब समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे महाविद्यालये आपली जबाबदारी झटकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यापीठाने नोंदणीला मुदतवाढ दिली असली तरी, संबंधित महाविद्यालये तसेच विभागांवर कुठलीही कारवाई केलेली नाही.‘एमकेसीएल’सोबत करार झाल्यानंतर विद्यापीठाने परत ‘ई-सुविधा’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबत ‘आॅनलाईन’ नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख २ सप्टेंबर ही होती. या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज जमा केले. यानंतर महाविद्यालय व विभागांतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या अर्जांची ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची होती. नियमानुसार हे काम विद्यार्थ्यांचे नसून विभाग किंवा महाविद्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांचेच आहे. परंतु अर्ज जमा झाल्यानंतर अनेक महाविद्यालये व शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनाच ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे. कर्मचारी जास्त कामापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांवर ‘आॅनलाईन’ नोंदणी करवून घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. विद्यापीठाच्या काही शैक्षणिक विभागांतदेखील असेच चित्र आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये तर ‘आॅनलाईन’ नोंदणीची सोयदेखील नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जवळपासच्या ‘नेटकॅफे’मधून अर्ज भरावा लागत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा फायदा उचलत ‘नेटकॅफे’ चालकांकडून अर्जामागे ५० ते १०० रुपये घेण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)महाविद्यालयांना उशिरा आली जागशहरातील काही महाविद्यालयांना तर ‘आॅनलाईन’ नोंदणीसंदर्भात उशिरा जाग आली. नोंदणीला काही दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यास सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांना फोनच न लागल्यामुळे प्राध्यापकांची धावाधाव होत असल्याचे चित्र आहे. शिवाय महाविद्यालयांत ‘आॅनलाईन’ नोंदणीची व्यवस्था नसल्यामुळे जास्त वेळ थांबून बाहेरूनच नोंदणी करावी लागत आहे.महाविद्यालयांची भूमिका अयोग्यनियमांनुसार संबंधित महाविद्यालय व विभागांनाच ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची आहे. यात विद्यार्थ्यांना भुर्दंड बसत असेल तर ही अयोग्य बाब आहे. यासंदर्भात महाविद्यालयांच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले.
महाविद्यालयांच्या हलगर्जीचा हजारो विद्यार्थ्यांना फटका
By admin | Published: September 11, 2015 3:29 AM