नागपूर : जगभरात सर्वत्र मानवी वसाहती आणि मानवी संस्कृती रुजली ती नद्यांच्या काठावरच. मानवाच्या अस्तित्वाला स्थायी रूप देणाऱ्या नद्या मात्र मानवी हव्यासाच्या बळी ठरल्या आहेत. आपल्या देशात गेल्या ७० वर्षात हजाराे लहान नद्या व उपनद्या जवळजवळ लुप्तप्राय झाल्या आहेत. बारमाही असणाऱ्या ७० टक्के नद्या आता हंगामी झाल्या आहेत. अत्याधिक, अमर्याद जलउपसा, रेती उपसा आणि प्रदूषणाने नद्यांचे अस्तित्व संकटात लाेटले आहे.
‘विकास’ हा शब्द आता पर्यावरणासाठी मारक ठरला आहे. विकासाच्या नावावर बहुतेक नैसर्गिक घटक संकटात आले असून भविष्यात मानवाला याचे परिणाम भाेगावे लागणार आहेत. पर्यावरण व नदी वैज्ञानिक प्रा. व्यंकटेशन दत्ता यांनी त्यांच्या अभ्यासपेपरमधून देशभरातील नद्यांचे धक्कादायक वास्तव मांडले आहे. ४०-५० वर्षांपूर्वी देशभरातील बहुतेक नद्या या बारमाही हाेत्या. आता मात्र त्यांचा प्रवाह केवळ पावसाळ्यात वाहताना दिसताे. देशातील ७० टक्के नद्या हंगामी झाल्या आहेत आणि जगभरात हेच चित्र आहे. भारताच्या संदर्भाने हे भविष्यातील माेठ्या संकटाचे संकेत असल्याचे प्रा. दत्ता यांनी व्यक्त केले.
- नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहापेक्षा त्यातून पाण्याचा उपसा केला जात आहे.
- धरणे बांधून पाण्याचा प्रवाह राेखला व कालवे काढून पाण्याचे अत्याधिक शाेषण केले. नद्यांपेक्षा कालव्यांची लांबी माेठी झाली आहे. जगात सर्वाधिक ७४ हजार किलाेमीटर लांबीचे कालवे उत्तर प्रदेशात आहेत. कालव्यातून बाराही महिने पाणी वाहावे म्हणून नद्यांचे शाेषण केले जात आहे.
- माेठ्या प्रमाणात हाेणारा भूजल उपसा हेही नद्या सुकण्याचे प्रमुख कारण आहे. ५० वर्षात भूजल खाली गेले आणि रिव्हर बेड वर आले आहेत.
- प्रदूषण हे तर नद्यांची हत्या करण्यामागचे सर्वश्रुत कारण ठरले आहे.
महाराष्ट्रातील ५३ नद्या अतिप्रदूषणाच्या विळख्यात
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील ३५१ नद्या अतिप्रदूषणाच्या विळख्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील ५३ नद्या आहेत. मुंबईची उल्हास आणि मिठी नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. विदर्भातील वैनगंगा व वर्धा नदीचाही या यादीत समावेश आहे. वैनगंगेचा तुमसर ते आष्टीपर्यंतचा ७०७ किमीचा पट्टा प्रदूषणाच्या विखळ्यात आहे. कन्हान नदीचा नागपूर ते भंडारा हा १०० किमीचा विस्तार अति प्रदूषणाच्या श्रेणीत आहे.
अमर्याद रेती उपशातून नद्यांची हत्या
बांधकामासाठी वाळूला पर्याय नाही. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपशातून नद्यांची हत्या केली जात आहे. देशात वर्षाला ७० दशलक्ष टन वाळूचा उपसा हाेताे व यामध्ये दरवर्षी ७ टक्क्यांनी वाढ हाेत आहे. ‘वर्ल्डवाईड फंड फाॅर नेचर’च्या रिपाेर्टनुसार जगात दरवर्षी ५० अब्ज मेट्रिक टनाचा उपसा नद्यांमधून हाेताे. वाळू उपसा हा सर्वात माेठा व्यवसाय झाला असून यामध्ये माेठ्या अधिकाऱ्यांच्या हत्या करायला मागेपुढे पाहिले जात नाही. जानेवारी २०१९ ते नाेव्हेंबर २०२० या काळात १९३ लाेकांच्या हत्या करण्यात आल्या. अमर्याद वाळू उपशामुळे नद्यांचा प्रवाह बिघडला आणि वारंवार पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली. वाळूमध्ये अंडी देणाऱ्या मासे, झिंगे, कासव, खेकडे, बेडूक आदी प्राण्यांची जैवविविधता नष्ट झाली आहे. प्रा. दत्ता यांच्या मते वाळूचा पर्याय शाेधणे नितांत गरजेचे झाले आहे.