लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विखुरलेल्या अवस्थेतील अगरबत्ती उद्योगांना एकाच छताखाली आणण्याचे काम नागपूर महिला अगरबत्ती क्लस्टरने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने १०० महिला उद्योजिकांनी उमरेड एमआयडीसी येथे उभारलेल्या क्लस्टरला शासनाने सात एकर जागा आणि पाच कोटींचे अनुदान दिले आहे. क्लस्टर लवकरच नावारूपास येऊन एक हजार महिला आणि अप्रत्यक्षरीत्या दोन हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महिलांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेले हे क्लस्टर राज्यातील पहिले आहे.या क्लस्टरचे भूमिपूजन जागतिक महिलादिनाच्या मुहूर्तावर उमरेड एमआयडीसी येथे करण्यात आले. देशातील धार्मिक वातावरण बघता, दररोज ३० कोटी अगरबत्तीचा वापर करण्यात येतो. सध्या विदेशातून अगरबत्ती मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते. या क्लस्टरमुळे थोड्या फार प्रमाणात आयात कमी होईल. क्लस्टरमध्ये दररोज २० टन अगरबत्तीची निर्मिती होणार आहे.
उद्योजिकांना कर्जासाठी क्लस्टर मदत करणारपाच एकरमध्ये महिला उद्योजिकांना ३५ प्लॉट वाटपाची प्रक्रिया एमआयडीसीकडून सुरू आहे. एका युनिटमध्ये १० मशीन राहतील. शिवाय महिला उद्योजिकेला २५ लाख रुपये बँकेकडून कर्ज मिळवून देण्यात येणार आहे. २५ लाख शेड व मशीनची उभारणी आणि त्यांचे भागभांडवल राहील. याशिवाय ३५ उद्योजिकांनी गोळा केलेल्या दोन कोटी रुपयांतून सामूहिक सुविधा केंद्राची जागा खरेदी आणि इमारत उभी राहणार आहे. केंद्रातून कच्चा माल महिलांना देऊन त्या पक्का माल तयार करणार आहे. अगरबत्तीचे मार्केटिंग संचालिका करणार आहेत. महिलांनी अगरबत्ती बनविण्याचे काम सुरू केले आहे. मोठ्या कंपन्यांकडून आॅर्डर मिळाली आहे. हे क्लस्टर प्रत्यक्षपणे वर्षभरात नावारूपास येणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.
दोन एकरमध्ये सामूहिक सुविधा केंद्र, पाच एकरमध्ये ३५ युनिटक्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भरणे यांनी सांगितले की, नागपूर महिला अगरबत्ती क्लस्टरच्या चार संचालिका वर्षा भरणे, सीमा मेश्राम, रसिका धाबर्डे, प्रतिभा बनारसे यांनी प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला. त्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना क्लस्टर स्थापनेसाठी पत्र दिले होते. सात एकर जागेपैकी दोन एकरमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज सामूहिक सुविधा केंद्र राहणार आहे. या केंद्रात गडचिरोली आणि गोंदिया येथून आणलेल्या बांबूवर प्रक्रिया करून काड्या तयार करण्यात येईल. काड्या तयार झाल्यानंतर टाकाऊ बांबूपासून ‘सॉ डस्ट’ आणि विशेष प्रक्रियेद्वारे कोळसा तसेच त्याच्याशी निगडित इतर साहित्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. शिवाय पाच एकर जागेवर ३५ महिलांना ३०० ते ५०० चौरस मीटर जागा देऊन त्यांना युनिट स्थापनेसाठी क्लस्टर मदत करणार आहे.
२० ते २५ टक्के नफा मिळणारमहिलांनी संघटित होऊन क्लस्टर स्थापन केल्यामुळे त्यांचा नफा वाढून २० ते २५ टक्क्यांवर जाणार आहे. क्लस्टरमध्ये ६० टक्के एससी, एसटी आणि ४० टक्के ओबीसी महिलांचा समावेश आहे. दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सच्या (डिक्की) माध्यमातून या क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्वात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे हा भारतातील अशा पद्धतीचा एकमेव क्लस्टर आहे.
क्लस्टरला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारवर्ष २०१८-१९ साठी या क्लस्टरला महाराष्ट्र शासनाच्या संचालनालयांतर्गत तसेच १०० टक्के महिला उद्योजिकाच्या क्लस्टर प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट क्लस्टरचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. या क्लस्टरमुळे चीन व व्हिएतनामवरून होणारी कच्च्या अगरबत्तीची आयात काही प्रमाणात कमी होणार असून त्यामुळे देशाचे परकीय चलन वाचेल, असा दावा भरणे यांनी केला आहे.