नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींसाठी धमकी देण्याच्या प्रकरणात अटक करून नागपुरात आणण्यात आलेला दहशतवादी अफसर पाशा बशिरुद्दीन नूर मोहम्मद याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र चौकशीदरम्यान पाशा पोलिस यंत्रणेला सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तो चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असून, वारंवार तो उत्तरे बदलत आहे. त्यामुळे त्याच्याकडून तथ्य बाहेर काढून घेण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.
कांथा ऊर्फ जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याच्या चौकशीदरम्यान अफसर पाशाची ‘लिंक’ समोर आली होती. पोलिसांनी त्याला बेळगाव येथील हिंदलगा कारागृहातून अटक केली व शनिवारी त्याला नागपुरात आणले. पाशाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाशाला पाच दिवसांची (दि. १९ जुलैपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. धंतोली पोलिस ठाण्यात जयेश पुजारीसह अफसर पाशावर दोन गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणातसुद्धा पाशाची चौकशी करण्यात येणार आहे. पाशा चौकशीदरम्यान जाणूनबुजून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून याबाबत कुठलेही भाष्य करण्यात आलेले नाही.
एनआयएकडून होऊ शकते चौकशी
दरम्यान, एनआयएने या प्रकरणात शाकीरची चौकशी केली होती. त्यानंतर एनआयएकडून त्याचा ताबा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता पाशाचीदेखील एनआयएच्या पथकाकडून चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. एनआयएचे पथक पुढील आठवड्यात नागपुरात येण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कुठलीही अधिकृत सूचना आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.