लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारवाई करणाऱ्या महिला तहसीलदारासोबत गाैण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्याने वाद घालून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हिंगणा-एमआयडीसी मार्गावर रविवारी दुपारी ही घटना घडली.
एमआयडीसी, वाडी, हिंगणा आणि शहराच्या टोकावर वसलेल्या अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळू, गिट्टी, मुरुम या गाैण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी आणि तस्करी केली जाते. या गोरखधंद्यात गुंतलेल्यांकडून रोज लाखोंचा महसूल बुडविला जातो. पोलिसांनाही त्याची कल्पना असते. मात्र, अनेक ठिकाणचे पोलीस त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. रविवारी दुपारी अशाच प्रकारे गिट्टीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने, तहसीलदार ज्योती विक्रम भोसले (वय ३३, रा.हिंगणा टाऊन, धनगरपुरा) यांनी कारवाईचा पवित्रा घेतला. आपल्या पथकाला घेऊन त्या वानाडोंगरीत एमआयडीसी-हिंगणा मार्गावर गाैण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करू लागल्या. त्यांनी एमएच ३१-डीएस ६०३७ क्रमांकाची कागदपत्रे तपासली असता, तो विना परवाना गिट्टीची वाहतूक करीत असल्याचे लक्षात आले. याबाबत वाहनमालक श्रावण मनोहर गोसावी आणि वाहन चालकाकडे विचारणा केली असता, गोसावीने ज्योती भोसले यांच्याशी वाद घातला. त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. यामुळे भोसले यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गोसावी आणि त्याच्या वाहन चालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून ३४ हजारांची गिट्टी, तसेच तीन लाखांचे वाहन जप्त केले.
-----