ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 3 - फुटपाथवर बसून फळ, भाजी विकणा-यांना विविध भागातील गुंड खंडणीसाठी त्रास देत आहेत. सोमवारी दुपारी अजनी रेल्वेस्थानकाजवळ पाच गुंडांनी अशाच प्रकारे एका भाजी विक्रेत्याला खंडणीसाठी मारहाण करून खुनाची धमकी दिली. एवढेच नव्हे तर अनेकांसमक्ष त्याच्या खिशातील रक्कम हिसकावून नेली. मध्यप्रदेशातील दठिया सुराहट (सिंदी) येथील रहिवासी रोहित श्रीराजमन जयस्वाल (वय २०) सध्या कांबळे चौकात राहतो. तो धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजनी रेल्वेस्थानकाजवळच्या फुटपाथवर फळ-भाजीचे दुकान लावतो. सोमवारी दुपारी ३ वाजता शुभम प्रकाश ऊइके, मंगल मोहन यादव, राजू श्यामलाल अहिर (रा. तिघेही तकिया, धंतोली) आणि आकाश तिवारी तसेच त्याचा भाऊ बबलू तिवारी (रा. चुनाभट्टी, धंतोली) जयस्वालच्या दुकानात आले. त्यांनी जयस्वालला शिवीगाळ करून येथे दुकान लावायचे असेल तर महिन्याला आठ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल. तसेच रोज ३०० रुपये खर्चासाठी वेगळे द्यावे लागेल, असे म्हणून खर्चाचे पैसे मागितले. खंडणी दिली नाही तर ठार मारू , अशी धमकीही आरोपींनी दिली. जयस्वालने त्यांना नकार दिला असता आरोपींनी बाजुला पडलेला लाकडी दंडा उचलून जयस्वालला बेदम मारहाण केली आणि त्याच्या जवळचे ८०० रुपये हिसकावून नेले. या घटनेनंतर अन्य दुकानदारांना आरोपींनी अशाच प्रकारे धमकावले. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. जयस्वालने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध मारहाण, लुटमार, खंडणी वसुली आणि धमकीचा गुन्हा दाखल केला.
खंडणीसाठी खुनाची धमकी
By admin | Published: January 03, 2017 9:15 PM