नागपूर : वडिलांच्या मृत्यूनंतर अंतिम क्रियांसाठी नागपुरात आलेल्या सतीश उकेने निगराणीच्या कर्तव्यावर असलेल्या ईडीच्या कर्मचाऱ्याला केस करण्याची धमकी देत घराबाहेर हाकलले. या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर उकेविरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोट्यवधीच्या जमीन फसवणूक प्रकरणात सतीश उके व प्रदीप उके या भावांना अटक करण्यात आली होती. त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने अंतिम क्रियांसाठी न्यायालयाने त्यांना २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान घरी जाण्याची परवानगी दिली. ईडीचे सहायक संचालक पंकज गोयल यांच्या निर्देशांनुसार शिवराम हळदणकर व टी.थर्मराज यांना दोन्ही भावांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी दोन्ही कर्मचारी उके बंधूंच्या पार्वतीनगर येथील घरी पोहोचले. तशी कल्पना प्रदीप उकेला देण्यात आली.
२३ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास सतीश उकेला तळोजा येथून घरी आणण्यात आले. त्यावेळी तुम्ही कोण, अशी ईडीच्या कर्मचाऱ्यांना उकेने विचारणा केली. त्यांनी ते कर्तव्यावर असल्याची माहिती देताच उकेने आरडाओरडा करत माझ्या घरात ईडीचे लोक कसे आले, असा सवाल केला. तुम्ही आमच्यावर वॉच ठेवू शकत नाही. गरज पडली तर फोनवर बोलविण्यात येईल. जर थांबले तर तुम्ही आमचे बेकायदेशीररीत्या डिटेंशन केले अशी न्यायालयात तक्रार करू, अशी उकेने दोन्ही कर्मचाऱ्यांना धमकी दिली.
उकेच्या आईची पोलिस ठाण्यात तक्रार
दरम्यान, सतीश उकेचा भाऊ प्रदीप उके व आई पुष्पा उके यांनी ईडीच्या कर्मचाऱ्यांविरोधात अजनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. आई बाथरूममध्ये आंघोळीसाठी आत असताना ईडीचे कर्मचारी आत शिरले होते. आई हृदयविकार आणि अन्य आजाराने ग्रस्त असून, अचानक ईडीचे अधिकारी घरात घुसल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिची प्रकृती खराब झाली, असा आरोप तक्रारीत लावण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करणयात आला नाही.