नागपूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमक्यांचे फोन आणि मेसेज आले आहेत. ही गंभीर बाब वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली असून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील सातत्याने करीत आहे. या मागणीला ओबीसी नेते म्हणून वडेट्टीवार यांनी विरोध केला होता. जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभुल करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली होती मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीतून नकोच अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्याबाबत बोलल्यानंतर वडेट्टीवार यांना मोबाईलवर धमक्या आल्या आहेत.
सध्यस्थितीत विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षेत तीन जवान व एक गाडी तैनात असते. मात्र, मोबाईलवर येणाऱ्या धमक्या पाहता आपल्या सुरक्षेत आणखी वाढ करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.