लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेयसी सोडून गेल्यामुळे संतप्त प्रियकराने तिला तिचे खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सोबतच तिची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचीही त्याने धमकी दिल्यामुळे प्रेयसीने गुरुवारी रात्री मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. केतनसिंग तुकाराम पाटील असे आरोपीचे नाव आहे. तो बस्तरवाडी, कागल (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी आहे.तक्रार करणारी तरुणी (वय २६) इंजिनिअर असून, पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. ती मूळची चंद्रपूरची रहिवासी आहे. आरोपी आयटीआय झाला असून, तो २०११ पर्यंत चंद्रपूरला एका कंपनीत कामाला होता. त्यावेळी तरुणीसोबत त्याची ओळख आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शिक्षणाच्या निमित्ताने ती २०११ ला नागपुरात आली असता आरोपीही येथे आला. येथे हे दोघे चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर तरुणीला पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी लागली. त्यामुळे हे दोघेही २०१५ मध्ये पुण्याला गेले. तेथे देखील ते लिव्ह इनमध्ये राहू लागले. तब्बल आठ वर्षे सोबत राहिल्यानंतर अलिकडे त्यांच्यात विसंवाद वाढला. कडाक्याची भांडणं होत असल्यामुळे तिने मार्च २०१९ मध्ये त्याला सोडून नागपूर गाठले. पुण्याहून ती नागपूरला परत आली तेव्हा तिचा लॅपटॉप आणि स्कुटर आरोपी केतनसिंगकडेच राहून गेली. दरम्यान, ती परत येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या केतनसिंगने तिला वारंवार फोन मेसेज करून दोघांचे एकांत क्षणातील फोटो आणि चॅट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्याची वृत्ती लक्षात घेता तरुणीने आपल्या पालकांशी संपर्क करून गुरुवारी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ४०६, ४२०, ३५४ (ड) अन्वये तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक पुण्याला जाणार आहे.