नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारी व्यक्ती कर्नाटक राज्यातील बेळगावची असल्याचे तपासात उघड झाल्याने, पोलिसांचे एक पथक बेळगावकडे रवाना झाले आहे. गडकरी यांना धमकी देणारे तीन फोन शनिवारी सकाळी ११.३० ते १२.३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या खामला येथील कार्यालयात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरू केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खामला चौकात ऑरेंजसिटी हॉस्पिटलसमोर कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धमकी देणारे दोन फोन आले. पहिल्या फोनमध्ये आरोपीने ३ मिनिटे १४ सेकंद, तर दुसऱ्या कॉलमध्ये आरोपीने दोन मिनिटे संवाद साधून मी डी गँगचा सदस्य असून १०० कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही माहिती कार्यालयातील टेलिफोन ऑपरेटरने गडकरी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि धंतोली पोलिसांना दिली. लगेच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि धंतोली पोलिस खामला येथील कार्यालयात पोहोचले. ते तपास करीत असताना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आरोपीने पुन्हा तिसरा कॉल करून आपले गडकरींशी बोलणे करून द्या, म्हणत आपला मोबाइल क्रमांकही दिला. आरोपीने हे तीनही कॉल आपल्या मोबाइलवरून लावल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, आरोपीच्या शोधात गुन्हे शाखेचे एक पथक कर्नाटकमधील बेळगावला रवाना झाले आहे. फोन करणारा आरोपी कर्नाटकमधील मोठा गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सायंकाळी सात वाजेपर्यंत याबाबत धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
आरोपीच्या शोधात पथक रवाना
पोलिस आणि दहशतवादविरोधी पथक फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकमध्ये रवाना झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमात आम्ही सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली. रविवारपर्यंत आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे.
- मुम्मका सुदर्शन, गुन्हे शाखा उपायुक्त, नागपूर शहर
..........