नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी आणि रविवारी धमकीचे फोन आल्यानंतर तपास यंत्रणांनी फोन करणाऱ्यांची चौकशी सुरू केली असतानाच मंगळवारी सकाळी पुन्हा देशमुख यांच्या बंगल्यावर धमकीचा फोन आला. फोन करणाºयाने स्वत:ला दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड सांगून गृहमंत्री देशमुख यांना कंगना रनौत प्रकरणात लक्ष देऊ नका, अशी धमकी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख या तिघांना वेगवेगळ्या वेळी आलेल्या धमकीच्या फोनमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या संबंधाने सर्वत्र चर्चेचे रान पेटले असताना तपास यंत्रणांनी फोन करणाऱ्यांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके कमी लावली आहेत. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी ११.३४ ला गृहमंत्री देशमुख यांच्या स्थानिक निवासस्थानी लॅण्डलाईनवर पुन्हा धमकीचा फोन आला. ऑपरेटरने फोन करणाºयाला त्याचे नाव विचारले असता, मी दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड खालिद बोलतो, असे तो म्हणाला. ‘तुझ्या साहेबांना माझे नाव सांग आणि कंगना रनौत प्रकरणात जास्त लक्ष देऊ नका, असा निरोप दे,’ असे कॉलर म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.
शनिवारी रात्री देशमुख यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर चार वेळा, रविवारी आणि मंगळवारी बंगल्यावर दोन वेळा धमकीचे फोन आले. आज फोन करणाºयाने ज्या पद्धतीने बोलणी केली, ते पाहता कुणीतरी हा खोडसाळपणा करीत असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.
पोलीस आयुक्त म्हणतात, मी बघतो!
या संबंधाने लोकमतने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. गृहमंत्री धमकी प्रकरणाच्या तपासात काय घडामोडी आहेत, अशी त्यांना विचारणा केली असता, सांगण्यासारखे काही नाही, असे ते म्हणाले. आज पुन्हा धमकीचा फोन आला, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता मी बघतो, असे म्हणत त्यांनी फोन कट केला.ंूं