केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी शनिवारी नागपूर पोलिसांनी मोठी माहिती दिली. गुन्हेगार आणि गँगस्टर जयेश कांथा यानं गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केल्याचे पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, हा गुन्हेगार सध्या बेळगावातील तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातूनच धमकी दिली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्या कार्यालयात फोन करणारा हा गँगस्टर आणि हत्येचा आरोपी जयेश कांथा आहे. त्यानं अवैधरित्या फोनचा वापर केला आणि गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याची माहिती नागपूरचे सीपी अमितेश कुमार यांनी दिली.
बेळगाव तुरुंग प्रशासनानं आरोपीकडील एक डायरी आपल्या ताब्यात घेतली आहे. तसंच नागपूर पोलिसांनी आरोपीसाठी पोडक्शन रिमांड मागितली आहे. या प्रकरणी आरोपीची पुढील चौकशी करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याला महाराष्ट्रात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
धमकीचे तीन फोनकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील खामला चौकात ऑरेंजसिटी हॉस्पीटलसमोर जनसंपर्क कार्यालय आहे. शनिवारी त्यांच्या या कार्यालयात धमकीचे फोन आले. कार्यालयात सकाळी ११.२९ वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. दुसरा फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन हा १२.३२ वाजता आला. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.