योगेश पांडे
नागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मॅसेजवरील लिंक ‘क्लिक’ करणे एका विद्यार्थिनीला प्रचंड महागात पडले आहे. तिला न घेतलेल्या कर्जासाठी सातत्याने धमक्या येत असून तिच्या फोनवरील सर्व ‘डेटा’देखील ‘हॅक’ झाला आहे. इतकेच नाही तर तिच्या मोबाईल कॉन्टॅक्ट्समधील तिच्या नातेवाईकांना ‘मॉर्फिंग’ केलेले न्यूड फोटो पाठविण्यात येत आहेत. या प्रकाराने विद्यार्थिनी प्रचंड धक्क्यात असून यातून बाहेर कसे पडावे हा प्रश्न तिला सतावतो आहे.
यासंदर्भात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थिनीला नुकतीच पदवी मिळाली आहे. मागील आठवड्यात तिच्या व्हॉट्सअपवर ६३९०९९२२०१५६ या क्रमांकावरून मॅसेज आला. त्यात एका संकेतस्थळाची ‘लिंक’ होती व तुम्ही आमच्याकडून घेतलेले कर्ज त्वरित भरा अन्यथा तुमचे फोटो व्हायरल होतील, असे लिहीले होते. विद्यार्थिनीने कुतूहल म्हणून त्या ‘लिंक’ला क्लिक केले व त्यानंतर तिच्या मोबाईलवर ‘ॲप’ डाऊनलोड झाले. यासाठी तिने अजाणतेपणे सर्व परवानग्यादेखील दिल्या. मात्र त्यानंतर तिचा मन:स्ताप सुरू झाला. तिला वेगवेगळ्या क्रमांकावरून व्हॉट्सअप मॅसेजेस व फोन येण्यास सुरुवात झाली. तुम्ही त्वरित कर्जाची रक्कम भरा नाहीतर तुमचे वाईट फोटो व्हायरल करू अशी धमकी द्यायला लागले.
विद्यार्थिनीने घाबरून त्यांना १२ हजार ९१० रुपये पाठविले. त्यानंतर तिने ते ॲप डिलीट केले. मात्र त्यानंतर तिच्या नातेवाईकांना तिने कर्ज घेतले असून तिचे फोटो व्हायरल करू अशा धमक्या यायला लागल्या. आश्चर्याची बाब म्हणजे सोबत तिचा मॉर्फ केलेला न्यूड फोटोदेखील पाठविण्यात आला. असे मॅसेजेस तिच्या अनेक नातेवाईकांनादेखील गेले. या प्रकारामुळे तिला आणखी धक्का बसला. प्रकरण गंभीर झाल्याने तिने अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू आहे.
विद्यार्थिनी मानसिक धक्क्यात
आयुष्यात कुठलेही कर्ज घेतले नसताना अशा प्रकारे धमकीचे फोन येणे व त्यानंतर नातेवाईकांमध्ये मॉर्फ केलेले घाणेरडे फोटो व्हायरल होणे यामुळे संबंधित विद्यार्थिनी प्रचंड मानसिक धक्क्यात आहे.
वेळीच सावध व्हा, अन्यथा कुणीही शिकार होईल
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना एका ‘क्लिक’मुळे कुणाच्याही फोनमधील संपूर्ण ‘डेटा’ वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती जाऊ शकतो. यामुळे पैशांचे नुकसान तर होतेच, याशिवाय अशा प्रकारांमुळे मॉर्फ केलेले फोटो व्हायरलदेखील केले जातात. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मॅसेजला लगेच डिलीट करणे आवश्यक आहे. जर मॅसेज चुकीने वाचला तर त्यातील कुठल्याही ‘लिंक’ला क्लिक करू नये असे आवाहन सायबरतज्र्ज्ञांकडून करण्यात येत आहे.