लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला उडवून देण्याच्या धमकीच्या फोनपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबई आणि दिल्लीहून धमकीचे फोन आले. वेगवेगळ्या नंबरवरून एकूण पाच वेळा फोन करून दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने अनिल देशमुख यांना ‘संभाल के रहना’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणाची तक्रार नागपूर पोलिसांकडे करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी देणारा फोन रविवारी रात्री दुबईहून आल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. मात्र तत्पूर्वीच शनिवारी रात्री १० वाजून २४ मिनिटांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबईहून चार वेळा फोन आले. हे चारही कॉल गृहमंत्री देशमुख यांचे स्वीय सहायक योगेश कोठेकर यांनी उचलले. आरोपी कॉलरने आपण दुबईतून बोलत असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख यांना सांभाळून राहा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी दुपारी १.३४ वाजता गृहमंत्री देशमुख यांच्याशी सिव्हिल लाईन्समधील बंगल्यावरच्या लँडलाईनवर फोन आला. कॉलरने आपले नाव संजयकुमार सिंग सांगितले आणि पुन्हा गृहमंत्री यांना धमकी दिली. देशमुख यांनी रविवारी रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना या धमकीच्या फोनची माहितीवजा तक्रार दिली. थेट गृहमंत्र्यांनाच फोन आल्यामुळे पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. नमूद दोन्ही क्रमांक कुठले आहेत, त्याचा शोध घेतला जात आहे.आता काही सांगणार नाही : पोलीस आयुक्त यासंबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी लोकमतने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले. आपण यावेळी या प्रकरणाच्या संबंधाने काहीही बोलू इच्छित नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांपूर्वी गृहमंत्र्यांना धमकी : दुबई आणि दिल्लीहून फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 12:04 AM
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला उडवून देण्याच्या धमकीच्या फोनपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबई आणि दिल्लीहून धमकीचे फोन आले.
ठळक मुद्देपोलिसांकडे तक्रार चौकशी सुरू