नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्यामुळे आणि ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे धंतोली पोलिसांनी दाखल केलेल्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीकडे हस्तांतरित करण्यात यावा, यासाठी दाखल अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला.
हा अर्ज स्वतः नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीने दाखल केला होता. सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे एजन्सीला धक्का बसला आहे. एजन्सी आता या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे वृत्त आहे. धंतोली पोलिसांनी या प्रकरणात जयेश पुजारी व अफसर पाशा या दोन आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
सध्या दोन्ही आरोपी धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना बेळगावमधील कारागृहातून नागपुरात आणण्यात आले आहे. खंडणी व धमकीचे फोन त्या कारागृहातूनच करण्यात आले होते.