कामठी : कामठी शहरालगतच्या रनाळा गवात असलेल्या हवेली बार अँड रेस्टॉरंट व लॉजिंगमध्ये होत असलेल्या अश्लील कृत्यामुळे परिसरातील महिलांनी या बारची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. १९) रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बार व लॉजची पाहणी केली. यानंतर तक्रार करणाऱ्या महिलांना ९९७४४ ५०८८३ या मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या महिलांनी बुधवार (दि.२२) रोजी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक विजय मालचे यांची भेट घेत याबाबत तक्रार करीत होत असलेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील रनाळा गावात काही महिन्यापूर्वी हवेली बार अँड रेस्टरंट व लॉज उघडण्यात आले. या लॉजमध्ये होत असलेल्या अश्लील प्रकारामुळे परिसरातील महिलांनी केलेल्या तक्रारीवरून हवेली बार अँड रेस्टरंट व लॉजची परवानगी रद्द करण्यात आली होती. मात्र आता पुनश्च रनाळा स्थित महावीर नगर येथे हवेली बार अँड रेस्टाॅरंटला परवानगी देण्यात आली आहे. दाट लोकवस्तीत असलेल्या या बारमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बारच्या मालकाच्या कामठी बस स्टँड चौकातील सुनील बार व लॉजिंगवर पोलिसानी पिटा कायद्यांतर्गत कारवाईसुद्धा केली आहे. तेव्हा महावीर नगरच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने हवेली बार अँड रेस्टाॅरंटला दिलेली परवानगी रद्द करून सुरू असलेले बीअर बार बंद करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी रनाळा ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती, राज्य उत्पादन विभाग यांच्याकडे केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात रमा गजभिये, लीना वंजारी, सारिका चंद्रिकापुरे, सुशीला खोब्रागडे, योगिता बागडे, कंचन पटेल, मीना वैद्य, संगीता जयस्वाल, अनिता गजभिये, संगीता भिवगडे, रागिणी पिल्ले, छाया खोपे, सारिका कांबळी, कल्पना गायधने, सुरेखा चिंचखेडे, सविता म्हस्के, प्रियंका तालेवार, अरविंदा शिंदे, शालिनी वासनिक, छाया शहाणे, संध्या विश्वकर्मा, वंदना दोडके, ललिता इंगळे, कुसुम वाहने, सविता शिंदे, शकुंतला कोसळकर, सोनू ढवळे, वैशाली आरेकर, प्रिया मेश्राम यांच्यासह परिसरातील महिलांचा समावेश होता.
बारमधील कृत्यांची तक्रार करणाऱ्या महिलांना धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:07 AM