नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामठी तालुक्यातील एका खून प्रकरणामध्ये ठोस पुरावे नसल्यामुळे तीन आरोपींना निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
ज्ञानेश्वर केशव गेचोडे (४४), संजय हिरामण येंडे (४५) व सुधीर पांडुरंग पौनीकर (४७) अशी आरोपींची नावे असून ते सर्व आवंडी येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव नीलेश नथ्थू वाघमारे होते. ९ जुलै २०१४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आराेपींनी वाघमारेवर लोखंडी रॉड व सत्तूरने हल्ला करून त्याचा खून केला, असे सरकारचे म्हणणे होते. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाला आरोपींना दोषी ठरवण्यासाठी ठोस पुरावे आढळून आले नाही. त्यामुळे त्यांचे अपील मंजूर करण्यात आले.