बाभुळगाव बस स्थानक खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 08:34 PM2019-12-27T20:34:03+5:302019-12-27T20:35:32+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना बाभुळगाव, जि. यवतमाळ येथील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना बाभुळगाव, जि. यवतमाळ येथील आहे.
जाम्म्या ऊर्फ शेख जमीर शेख जब्बार (२७), शाहरुख खान बाबा खान पठाण (२३) व गोलू ऊर्फ सलीम गफ्फारखान पठाण (२२) अशी आरोपींची नावे आहेत. मयताचे नाव गणेश मेश्राम होते. तो बाभुळगाव बस स्थानक परिसरात पानठेला चालवित होता. घटनेच्या ७-८ महिन्यापूर्वी आरोपी व मेश्रामचा पानठेल्याच्या जागेवरून वाद झाला होता. दरम्यान, आरोपींनी मेश्रामला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यासंदर्भात मेश्रामने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर ११ डिसेंबर २०१६ रोजी आरोपींनी मेश्रामवर लोखंडी रॉड व चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.