नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना पाचपावली पोलिसांनी रविवारी रात्री १.३५ वाजेच्या सुमारास अटक करून त्यांच्याकडून एक लाख ६९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दोन आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सूरज महेश ब्राह्मणे (२७, ठक्करग्राम, पाचपावली), अंकित सुनील वाल्मीक (२२, मोठा बुद्धविहाराजवळ, जरीपटका) आणि अमन आकाश लोणारे (२२, लुंबीनीनगर, जरीपटका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी मध्यरात्री १.३५ वाजताच्या सुमारास गस्त घालताना पाचपावली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून काही आरोपी मोतीबाग, बेलिशॉप क्वार्टर मैदानाच्या भिंतीजवळ, मोकळ्या जागेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यातील दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
अटक केलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक लोखंडी पिस्तूल, चार जिवंत काडतुस, एक लोखंडी तलवार, एक चायनीज चाकू, मिरची पावडर, दोरी तसेच पल्सर २०० मोटारसायकल आणि दोन मोबाइल असा एकूण एक लाख ६९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल आढळला. यातील आरोपी सूरज हा नागपूर शहर आणि ग्रामीणमधून तडीपार असल्याचे समजले.
आरोपींविरुद्ध कलम ३९९, ४०२, सहकलम ३/२५, ४/२५, १३५, १४२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ढाकुलकर, विकास मनपिया, हवालदार विजय यादव यांनी केली.