नागपूर : कळमना बाजारातील व्यापाऱ्याच्या घरातून झालेल्या ५६ लाखांच्या चोरीच्या प्रकरणाचे गूढ अखेल उलगडले आहे. कर्जबाजारी नोकराने एक गुन्हेगार व इतर साथीदारांच्या मदतीने स्वत:च्याच मालकाच्या घरातून चोरी केली. पोलिसांनी सूत्रधार कर्मचाऱ्यासह तीन आरोपींना अटक करून २७ लाखांचा ऐवज जप्त केला.
मिथिलेश माखनसिंग मानकूर (२२, गुलशन नगर), भूपेश रमेश डोंगरे (४४, पाचपावली) आणि आशिष ऊर्फ डेंबो भीमराव भैसारे (२६, पाचपावली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चिखली चौकात राहणारे भाजी व्यापारी उमेश निपाने यांच्या घरातून २० ऑक्टोबर रोजी सकाळी ५६ लाख रुपयांची चोरी झाली. डुप्लिकेट चावीने कुलूप उघडल्याने कुणीतरी जवळचाच व्यक्ती यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी निपाने यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांना यादरम्यान मिथिलेशवर संशय आला. निपाने त्याला अनेकदा चावी देऊन घरी पाठवत असे. त्याला घराची संपूर्ण माहिती दिली. कर्जबाजारीपणामुळे मिथिलेश अडचणीत आल्याने पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची चौकशी केली. मिथिलेशने चोरी केल्याची कबुली दिली.
त्याने त्याचा मित्र आशिष भैसारे याला मालकाच्या घरात चोरीची युक्ती सांगितली. आशिषची गुन्हेगार भूपेश डोंगरेशी मैत्री आहे. त्यांनी भूपेशला माहिती दिली. निपाने यांचे घर पाहिल्यानंतर भूपेशने त्याचा मित्र गुन्हेगार मुश्ताक ऊर्फ भाईजान याला काम करून देण्यास सांगितले.
योजनेनुसार मिथिलेशने दोन महिन्यांपूर्वी निपाने यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाची डुप्लिकेट चाबी बनवली होती. त्याने आशिषला चावी दिली. आशिषने भूपेशमार्फत मुश्ताककडे चाबी सुपूर्द केली. निपाणे यांचा फ्लॅट पाहिल्यानंतर मुश्ताकने त्याच्या दोन साथीदारांवर चोरीचे काम सोपविले. २० ऑक्टोबरला सकाळी मिथिलेशने निपाने बंधू दुकानात आल्याची माहिती आशिषला दिली.
आशिषने मुुश्ताकला भूपेशच्या माध्यमातून ही बाब कळविली. त्याच्या दोन्ही साथीदारांनी फ्लॅटचा मुख्य दरवाजा डुप्लिकेट चावीने उघडला व कपाटाचे लॉकर फोडून रोख रक्कम चोरून नेली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २७ लाख रुपये आणि दुचाकी जप्त केली आहे. कळमन्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, महेंद्र अंभोरे, राहुल सावंत, विवेक झिंगरे, उत्तम जायभाये, अजय गर्जे, गंगाधर मुरकुटे, दीपक धानोरकर, रवी साहू, धनराज सिंगुवार, अभय साखरे, अशोक तायडे, अनिल टिकस, प्रशांत लांजेवार, यशवंत अमृते, वसीम देसाई, ललित शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.