नगरधन येथील हल्ला प्रकरण
रामटेक : नगरधन येथे तीन युवकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नगरधन येथील दुर्गा चौक येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास १५ युवकांच्या एका गटाने तीन युवकांवर हल्ला केला होता. यात भूषण सरोदे, श्रीराम धोपटे, राजीव धोपटे तिघेही रा. नगरधन हे गंभीर जखमी झाले होते. या तिघांवर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी विजय रमेश बंधाटे, मनीष नगरे व आशिष रमेश शेंद्रे यांना रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करीत पोलिसांनी ८ डिसेंबरपर्यंतचा पीसीआर मिळविला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे सकाळी रस्त्यावर जुगार खेळत असता भूषण सरोदे याच्या आईने त्यांना हटकले होते. याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी भूषणवर रात्री हल्ला केला. भूषणला वाचविण्यासाठी गेलेल्या श्रीराम धोपटे व राजू धोपटे यांनाही मारहाण करण्यात आली. हल्ला करणारे युवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे बोलले जात आहेत. घटनेचा तपास ठाणेदार दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.