लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील काही भागांत वन्य प्राण्यांचा वावर चांगलाच वाढला आहे. या प्राण्यांनी खरबडी (ता. नरखेड) शिवारातील राजेंद्र साेनवाने व महादेव साेनवाने (रा. खरबडी) या दाेन शेतकऱ्यांच्या साडेतीन एकरांतील कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री घडल्याची माहिती या दाेन्ही शेतकऱ्यांनी दिली.
कीड व राेगांचा वाढता प्रादुर्भाव व उत्पादनखर्च तसेच घटते उत्पादन व मिळणारा कमी बाजारभाव यांमुळे आपण या वर्षी साडेतीन एकरांत कपाशीची लागवड केल्याची माहिती राजेंद्र साेनवाने व महादेव साेनवाने यांनी संयुक्तरीत्या दिली. कपाशीचे पीक सध्या फुलधारणेच्या काळात हाेते. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री रानडुकरे व राेह्यांचा कळप शेतात शिरला आणि संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. ही बाब शनिवारी (दि. ४) सकाळी लक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.
आपण राेज रात्री शेतात जागली जायचाे; पण शुक्रवारी (दि. ३) रात्री जागली गेलाे नाही आणि वन्यप्राण्यांनी डाव साधला, असेही त्यांनी सांगितले. मागील काही वर्षांपासून या भागात राेही व रानडुकरांचा वावर चांगलाच वाढला आहे. दिवसागणिक त्यांची संख्या वाढत आहे. या प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदाेबस्त करण्याची वन अधिकाऱ्यांकडे अनेकदा मागणी केली. स्थानिक लाेकप्रतिनिधींनाही ही बाब माहिती आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष दिले नाही. या प्राण्यांचा दरवर्षी उपद्रव वाढत असून, माेठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असेही खरबडी येथील काही शेतकऱ्यांनी सांगितले.
शासन व वन विभागाने या वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदाेबस्त करावा, या भागात वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीने तातडीने पंचनामा व सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना त्यांच्या शेतमालाची बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, राजेंद्र साेनवणे, महादेव साेनवणे यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. या प्राण्यांचा बंदाेबस्त करणे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वन विभाग व शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी सांगितले.
...
साेयाबीनव्या पिकावर राेटाव्हेटर
जलालखेडा (ता. नरखेड) परिसरातील बहुतांश शिवारातील साेयाबीनच्या पिकाची खाेडमाशी व येल्लाे माेझॅकचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिबंधक उपाययाेजना करूनही ही कीड व राेग नियंत्रणात आले नाही. यासाठी केलेला खर्च वाया गेला आहे. पीक अकाली सुकायला सुरुवात झाली आहे. एका एकरात किलाेभर साेयाबीनचे उत्पादन हाेण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी राेटाव्हेटरने शेतातील साेयाबीनचे पीक काढायला सुरुवात केली आहे.
...
सर्पदंशामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात शेतात जागली करण्यासाठी जावे लागते. शेतात जागली करीत असलेल्या शेतकऱ्याच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा परिसरात १५ दिवसांपूर्वी घडली. शेतात जागली करताना पायाला दुखापत झाली. तिचा त्रास असह्य झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटनाही या भागात नुकतीच घडली.
040921\0219img-20210904-wa0089.jpg
फोटो ओळी. खरबडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उध्वस्त केलेले कपाशीचे पीक.