लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्यालयाच्या फेऱ्या न मारता लोकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान मिळावे. या उद्देशातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अॅपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन हजार ५०० नागपूरकरांनी अॅप डाऊनलोड केले आहे. आतापर्यंत ७०० च्या वर तक्रारी अॅपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी अर्ध्यांपेक्षा अधिक तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. त्याची माहितीही संबंधित नागरिकांना अॅपच्या माध्यमातूनच देण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी सात दिवसापूर्वी नागपूरकरांसाठी नागपूर लाईव्ह सिटी अॅप लाँच केले. शहरातील कुठलीही व्यक्ती मूलभूत सोयीसुविधांविषयी कुठलीही तक्रार या अॅपच्या माध्यमातून करू शकतात.या अॅपमुळे आता नागरिकांना महापालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदीसंदर्भातील तक्रारी अॅपच्या माध्यमातून करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. केवळ सात दिवसात ३,६०० नागपूरकरांनी अॅप डाऊनलोड केले आहे. दररोज ५०० नागपूरकर अॅप डाऊनलोड करीत असून, दिवसाला १०० तक्रारी प्राप्त होत आहेत. आतापर्यंत एकूण ७५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४१९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तर अधिकाऱ्यांना नोटीसविशेष म्हणजे अॅपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून, ते दररोज याचा आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून, निर्धारित वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अॅपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जाते. हे अॅप उपयुक्त असून तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.
साडेतीन हजार लोकांनी डाऊनलोड केले नागपूर लाईव्ह सिटी अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 9:27 PM
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अॅपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन हजार ५०० नागपूरकरांनी अॅप डाऊनलोड केले आहे.
ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांचा पुढाकार : प्राप्त ७०० तक्रारींपैकी ४१९ चे निराकरण